Today's Birthday Girish Mahajan (MLA, BJP, Jamner Dist. Jalgaon) | Sarkarnama

आजचा वाढदिवस गिरीश महाजन (आमदार, भाजप, जामनेर जि. जळगाव)

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 मे 2020

भारतीय जनता पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वेळोवेळी काम केले आहे. त्यामुळे त्यांची "संकटमोचक'म्हणूनही ओळख आहे.

गिरीश दत्तात्रय महाजन राज्याचे माजी जलसंपदा व आरोग्य शिक्षण मंत्री. जामनेर (जि. जळगाव) विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. या मतदार संघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वेळोवेळी काम केले आहे. त्यामुळे त्यांची "संकटमोचक'म्हणूनही ओळख आहे.

गिरीश महाजन यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरवात ग्रामपंचायतीपासून केली. सन 1992मध्ये प्रथम जामनेर (ता. जळगाव) ग्रामपंयतीत सदस्य म्हणून निवडून आले. 1992 ते 1995 पर्यंत ते सरपंच होते. त्यानंतर 1995 मध्ये जामनेर विधानसभा मतदार संघाची त्यांनी निवडणूक लढविली आणि आमदार झाले. यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे काम केले. युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सन 2014ते 2018 पर्यंत ते जलसंपदा व आरोग्य शिक्षण मंत्री होते. 

त्यांनी नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला आहे. शिवाय नाशिक, धुळे व जळगाव महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. भारतीय जनता पक्षाच्या ते नेते आहे. भारतीय जनता पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांनी अनेक वेळा त्यांनी यशस्वी मध्यस्थी करून पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाचे "संकटमोचक'म्हणून ओळखले जात आहे. आरोग्य सेवेत त्यांचे चांगले कार्य आहे. 

ग्रामीण भागातील रूग्णांना मुंबईतील नामाकिंत रूग्णालयात आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र यंत्रणाच निर्माण केली आहे. या शिवाय मंत्री असतांना राज्यात ठिकठिकाणी आरोग्य शिबीर भरवून मुंबई पुण्यातील नामाकिंत डॉक्‍टरांना ग्रामीण भागात घेऊन जावून रूग्णतपासणी केली शिवाय ज्यांना ऑपरेशनची गरज होती. त्यांचे त्या तज्ज्ञ डॉक्‍टराकडून ऑपरेशनही केले. सहकार क्षेत्रातही त्यांचा कार्य असून जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ते संचालक आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख