हाथरस प्रकरण दाबण्याचा योगी सरकारचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात 

हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करावी.
Yogi government's attempt to suppress Hathras case: Balasaheb Thorat
Yogi government's attempt to suppress Hathras case: Balasaheb Thorat

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कारप्रकरणी भाजप सरकार पहिल्यापासूनच काही तरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करून योगी सरकार कोणाला तरी वाचवण्याचा आटापिटा करत आहे. हाथरस प्रकरणी यूपी सरकारची भूमिका संशयास्पद असून हे प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. 

हाथरस बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी कॉंग्रेसच्या वतीने राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला. थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मंत्रालयाजवळील डॉ. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. 

या वेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, सरचिटणीस सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हाथरसची घटना अमानवीय असून योगी सरकार व यूपी पोलिसांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली, ते अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे.

हाथरसचे प्रकरण दाबण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते, माजी आमदार आरोपींच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत. पोलिस बळाचा वापर करून पीडित कुटुंबाला समाजापासून वेगळे पाडण्यात आले. विरोधकांना दंगली घडवायच्या आहेत, असा हास्यास्पद आरोप करून मूळ घटनेवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही थोरात या वेळी म्हणाले. 

भाजपच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले असून, त्यांच्यावर आता कोणाचाही विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करावी. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या कॉंग्रेसच्या मागण्या आहेत. पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करत असून, हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

राज्यभरात सत्याग्रह आंदोलन 

पुणे येथे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला. अमरावती येथे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले; तर नांदेड, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, बुलडाणा, यवतमाळ, सिधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, परभणी, भिवंडी, अकोला यासह राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांत कॉंगेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com