मल्लविद्येचा उपासक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित...

"लाल मातीशी इमान राखणारा मल्लविद्येचा एक सच्चा उपासक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित राहिला आहे. आजवरच्या सरकारने त्यांची उपेक्षा केली आहे,"
raju-sheti12f.jpg
raju-sheti12f.jpg

पुणे : "लाल मातीशी इमान राखणारा मल्लविद्येचा एक सच्चा उपासक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित राहिला आहे. आजवरच्या सरकारने त्यांची उपेक्षा केली आहे," अशी खंत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी हे पुजारी यांचे गाव आहे. गेली 27 वर्षे ते कुस्ती निवेदनाचे काम करत आहेत. शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली.

या भेटीनंतर शेट्टी यांनी, "कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी जीवाचे रान करणार्‍या पुजारीआण्णांची कुस्तीवरील निष्ठा अद्यापही उदासीन असलेल्या सरकारला दिसलेली नाही," अशी खंत व्यक्त केली आहे. "महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या लाल मातीवरील कुस्तीला काही दिवसांपूर्वी मरगळ आली होती. काळवंडलेल्या या लाल मातीला आपल्या रांगड्या आवाजाने जीवदान देणारा मल्लविद्येचा एक भक्त अविरतपणे लाल मातीची सेवा करण्यात तल्लीन झाला आहे. लाल मातीशी इमान राखणार्‍या त्या सच्च्या उपासकाचे नाव आहे पै. शंकर बापू पुजारी..
 
दोन पिढय़ांची कुस्ती परंपरा असल्याने वडील बापू पुजारी यांनी शंकररावांना सांगलीच्या सरकारी तालमीत सरावासाठी ठेवले. १९६३ ते ७५ या काळात त्यांनी चटकदार कुस्त्या केल्या. दिल्लीच्या सतपालला चितपट करणार्‍या हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्यासोबत झालेली कुस्ती बरोबरीत सोडवली. अनेक कुस्त्यांची मैदाने गाजवली. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या पुजारींनी १९८६ पासून कुस्ती निवेदनास सुरुवात केली. यावेळी ते पंचगिरीही करत होते. गेली २७ वर्षे ते निवेदन करत आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही कुस्तीचा आखाडा असो, कुस्त्यांच्या लढतीचे निवेदन करण्यासाठी पुजारी हजर असतात. 

सखोल व साध्या-सोप्या भाषेत निवेदन करणे ही पुजारीआण्णांची खुबी आहे. पुजारी यांनी आजवर सुमारे १६०० कुस्ती मैदानांमध्ये निवेदन केले आहे. मैदानात चालू असलेल्या लढतीतीच मल्लांचे नाव, गाव, तालीम, त्यांच्या वस्तादांचे नाव असा सगळा सात-बारा पुजारींच्या मेंदूरूपी संगणकात फीड असतो. मैदान सुरू झाल्यावर एकदा त्यांनी माईकचा ताबा घेतला की, सलग चार-चार तास पुजारी आपल्या रांगड्या आवाजाने कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवतात. चार वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान मल्लांच्या कुस्तीचे सलग १३ तास निवेदन त्यांनी केले आहे.

आठ वर्षांपूर्वी बायपास सर्जरी होऊनही दरवर्षी सुमारे १00 कुस्त्यांचे निवेदन ते करतात. मराठी, संस्कृत व हिंदीमधील सुंदर म्हणींचादेखील पुजारी कुस्ती मैदानात खुबीने वापर करून कुस्तीचा प्रचार-प्रसार करत असतात. बलाढय़ मल्लांच्या लढतीचे वर्णन करताना त्या वर्णनाला अध्यात्म व संतसाहित्याची जोड देणे हे पुजारींचे खास वैशिष्ट्य आहे."असे शेट्टी यांनी म्हटले आहे "लाल मातीशी इमान राखणारा मल्लविद्येचा एक सच्चा उपासक मात्र शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित राहिला आहे."अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com