शिवसेनेला रोज झोडणाऱ्या नारायण राणेंना मोदी सरकारमध्ये गिफ्ट मिळणार?

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींची चर्चा
narayan rane copy
narayan rane copy

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांच्या समावेशाची चर्चा सुरू असून या संभाव्य केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. (Expansion of Modi Govt) अनेक नावांवर चर्चा सुरू असली तरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नंदुरबारच्या खासदार डाॅ. हिना गावित यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, सांगलीचे संजयकाका पाटील आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्याही नावांना पसंती आहे. (New faces from Maharashtra may include in Modi Govt expansion) 

राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते.

सध्या असलेल्या सहा मंत्र्यांपैकी कुणालाही वगळण्याची शक्यता कमी दिसते. गडकरी-गोयल-जावडेकर-दानवे-आठवले यांचे स्थान निश्चित आहे. जर थोडीफार धाकधूक असेल तर तो संजय धोत्रे यांच्याबाबत आहे. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, असे सांगितले जाते. मात्र मनुष्यबळ आणि माहिती-तंत्रज्ञान-दूरसंचार अशी तगडी खाते असलेल्या आणि उच्चविद्याविभूषित असलेल्या धोत्रे यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आपुलकी दिसते. धोत्रेंना वगळले तर राणेंच्या नावावर प्राधान्याने विचार होऊ शकतो.

राणेंना राज्यात फडणविसांच्या मंत्रीमंडळात घेण्यात शिवसेनेचा आधीच्या युती सरकारमध्ये प्रचंड विरोध होता. एवढेच नाहीतर राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यालाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊ शकले नव्हते. राणेंना राज्याच्या मंत्रीमंडळात न घेण्याच्या शिवसेनेच्या अटीमुळे त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले. तेथेही त्यांना फारशी संधी मिळाली नाही. या दोन पक्षांतील संबंध विकोपाला गेल्यानंतर राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे शिवसेनेला रोज झोडण्याचे काम इमाने-इतबारे करत आहेत. त्याचा फायदा राणेंना होणार का, याच त्यामुळे उत्सुकता आहे. 

महाराष्ट्रातून ओबीसी किंवा आदिवासी खासदाराची वर्णी लागेल, असा होरा आहे. कारण ब्राह्मण, वैश्य, मराठा व दलितांना प्रतिनिधित्व मिळालेलेच आहे. अगोदरच दोन मराठा मंत्री (दानवे व धोत्रे) असल्याने राणे यांचा समावेश होण्याबाबत तर्कवितर्क आहेत. याच कारणाने पूनम महाजन, गिरीश बापट आदी नेत्यांच्या नावावर काट बसण्याची चिन्हे आहेत. मात्र, जर नंदूरबारमधून दोनदा निवडून आलेल्या डाॅ. हीना गावित यांच्या नावाचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. एक तर महिला, त्यात आदिवासी, त्यात उच्चविद्याविभूषित आणि त्यात भर प्रभावी संसदीय सहभागाची. संसदेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचाही त्यांना उपयोग होऊ शकते.

महाराष्ट्रातील या तीनही कॅबिनेट मंत्र्यांकडे अतिरिक्त खातीदेखील आहेत. गडकरींकडे रस्तेविकास व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयासोबत एमएसएमई खातेदेखील आहे. ही दोन्ही खाती कायम राहण्याची चिन्हे आहेत. गोयल यांच्याकडे रेल्वे, उद्योग-व्यापार व अन्न व नागरी पुरवठा अशी तीन भारदस्त खाती आहेत. त्यांच्याकडील किमान एक तरी खाते कमी होऊ शकते. जावडेकर यांच्याकडे माहिती व प्रसारण, पर्यावरण व अवजड उद्योग ही तीन खाती आहेत. त्यांच्याकडीलही किमान एक तरी खाते कमी होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com