'तुमचा बंदोबस्त करणार..' राऊतांना राणेंचा इशारा.. - we will take care of vinayak raut who was elected in modi wave in 2024 warns nilesh rane | Politics Marathi News - Sarkarnama

'तुमचा बंदोबस्त करणार..' राऊतांना राणेंचा इशारा..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

विनायक राऊत यांच्या विधानानंतर भाजपचे नेते व नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राणे यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जे यश मिळवून दिले, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्यावर खूष असून त्यांच्यामुळे राणेंना लवकरच मंत्रीमंडळात संधी मिळेल, असे बोलले जात आहे. 

यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. राऊत म्हणाले की, इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल. 

विनायक राऊत यांच्या या विधानानंतर भाजपचे नेते व नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी त्यांना उत्तर दिले आहे. निलेश राणे यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निलेश राणे म्हणतात, "स्वत: मोदी साहेबांच्या लाटेत दोनदा निवडून आले. हिम्मत असेल, तर राजीनामा देऊन परत निवडणुकीत उभे रहा. पाहू किती मते मिळतात. तुमची वेळ आता जवळ आली आहे, 2024 ला तुमचा बंदोबस्त करणार आणि कोकणातून कायमचा बाहेर काढणार"
 
नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी शहा यांनी राणेंची स्तुती केली होती. ''नारायण राणे हे मेहनती व अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. ते अत्यंत निडरपणे संघर्ष करतात. ते दंबग नेते आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द वळणावळणाची असली तरीही त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नाही, याची मी ग्वाही देतो. राणेंसारख्या नेत्याला कसे सांभाळायचे हे भाजपला चांगले समजते, असे शहा म्हणाले होते,'' 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणात नारायण राणे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे 'दबंग नेते' असा केला होता. "अनेक लोक स्वप्नं पाहतात. मात्र, आपली झोप विसरून त्या स्वप्न पूर्तीसाठी अहोरात्र मेहनत करणारे कमी असतात. त्यापैकी राणे हे आहेत,'' असे फडणवीस म्हणाले होते. ही स्तुती सूचक असून राणेंना भाजपमध्ये चांगले स्थान मिळण्यासाठी पोषक असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळात विस्तार येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होण्याची शक्यता आहे.या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात प्रामुख्याने भाजपा पश्चिम बंगाल मधील काही नेत्यांनी मंत्रीपद दिल जाऊ शकते. त्याचप्रमाणे बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे तेथील काही जणांची देखील वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागेल.

महाराष्ट्राच्या वाट्याला जे मंत्रीपद मिळेल त्यात प्रामुख्याने राज्यसभा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. विशेष करून मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेला सामारे जात असताना नारायण राणे यांना शिवसेनेच्या विरोधात पक्षातून राजकीय बळ देण्याची रणनिती आखली जात आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग दौऱ्यात नारायण राणे यांचा आम्ही योग्य तो सन्मान करू असे देखील अमित शहा म्हणाले होते. त्यानुसार राणे यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरु झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख