कोरोनाबाबत आणखी सजग राहण्याची गरच  : शरद पवार..'राष्ट्रवादी'कडून रुग्णवाहिकांचे लोकार्पण - We need to be more vigilant about Corona Sharad Pawar  Dedication of six ambulances by NCP | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाबाबत आणखी सजग राहण्याची गरच  : शरद पवार..'राष्ट्रवादी'कडून रुग्णवाहिकांचे लोकार्पण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

पंचशील फाउंडेशन पुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहरासाठी सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

पुणे : "कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे आपल्याला आणखी सजग आणि जागरुक राहण्याची तसेच आणखी साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे," असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पंचशील फाउंडेशन पुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहरासाठी काल सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी आमदार सुनिल टिंगरे, अविनाश साऴवे, रविंद्र माळवदवकर उपस्थित होते.
  
शरद पवार म्हणाले, "रुग्णांना संकटातून बाहेर काढण्यासाठी या रुग्णवाहिकांचा चांगला वापर करता येईल. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात गेल्या आठ दिवसांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बातम्यांमधून कळते आहे. त्यामुळे आपल्याला आणखी सजग आणि जागरुक राहण्याची तसेच आणखी साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. पंचशील फाउंडेशनच्या वतीने समाजोपयोगी कामे करण्यात येत आहेत. कोरोनाकाळात या संस्थेने आयसीयूचे बेड रुग्णालयांना उपलब्ध करून दिले. संस्थेचे काम कैातुकास्पद आहे." 

पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.24) दिवसभरात 771 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 329 जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 6 हजार 518 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शनिवारी 1 हजार 426 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 37 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये 172, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 191, नगरपालिकाक्षेत्रात 62 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 17 नवे रुग्ण सापडलेआहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 19 जण आहेत.पिंपरी-चिंचवडमधील 6, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शुक्रवारी (ता.23) रात्री 9 वाजल्यापासून शनिवारी (ता.24) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 19 हजार 100 झाली आहे. यापैकी 2 लाख 96 हजार 783 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख 48 हजार 416 जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 82 हजार 899, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 46 हजार 867, नगरपालिका क्षेत्रातील 13 हजार 107 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 5 हजार 494 जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत 7 हजार 676 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 336 जणांचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख