वाघोली गाव हे पुणे महापालिकेतच समाविष्ट होणार... - Wagholi Gram Panchayat will be included in the Municipal Corporation ... Green signal from Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

वाघोली गाव हे पुणे महापालिकेतच समाविष्ट होणार...

जनार्दन दांडगे
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

गेले अनेक दिवस हा विषय रखडला होता...

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्ट्रीने सर्वात मोठी ग्रामपंचायत असा लौकिक असलेल्या वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे महानगरपालिकेत सामाविष्ठ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघोली ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वाढत्या लोकसंख्येमुळे वाघोलीतील नागरीक हे पिण्याचे पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज यासारख्या पायाभूत सुविधापासुन वंचित राहत असल्याने आणि ग्रामपंचायतीलाही हा सारा भार पेलणे अवघड असल्याने आमदार अशोक पवार यांनी वाघोली ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेत सामाविष्ठ करण्याबाबतचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून सरकारकडे लावुन धरला होता. या पार्श्वभुमीवर नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नी बैठक घेतली. पवार यांनी वाघोली ग्रामपंचायत महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास ग्रीन सिग्नल दिला असल्याचे कळते आहे. वाघोली हे नव्याने तयार होणाऱ्या हडपसर पालिकेत घ्यावे, असे मध्यंतरी चर्चेत आले होते. मात्र तसे न करता पुण्यातच समावेश करण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.  

पुणे शहरालगतच्या ३४ गावांच्यापैकी वाघोली ही ग्रामपंचायत लोकसंख्येच्या दृष्ट्रीने सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. सध्याचा विचार करता वाघोलीची लोकसंख्या दीड लाखाच्यावर पोचलेली आहे. वाघोली हद्दीत १६५ मोठे बांधकाम व्यावसायिक काम करत आहेत. एकट्या वाघोली ग्रामपंचायत हद्दीत सध्या तब्बल चारशेहुन अधिक गृहनिर्माण संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. यामुळे वाघोलीची कागदोपत्री लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास असली तरी, वास्तवात मात्र  ही लोकसंख्येने कधीत दिड लाखाचा आकडा पार केला आहे.

 
वाढत्या लोकसंख्येमुळे वाढता घनकचरा, बेकायदेशीर बांधकामे, रस्ता कोंडी अशी आव्हाने तयार  झालेली आहेत. याचा ताण वाघोली ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात येत आहे. यामुळेच मागील वर्षभरापासून वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. 

पूर्व हवेलीमधील मोठ्या गावांना एकत्र करुन, स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्याबाबत शासन दरबारी चर्चा चालु असल्याने वाघोली बाबत निर्णय होत नव्हता. मात्र सध्याची स्थिती पहाता स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्यासाठी लागणारा निधी व त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता स्वतंत्र महानगरपालिकेचा विषय करणे शक्य नसल्याने, स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबचा विषय सध्या तरी मागे पडलेला आहे. 

वाघोली हॉऊसिंग सोसायटी असोसिएशनकडून स्वागत...

वाघोली हॉऊसिंग सोसायटी असोसिएशनचे संचालक संजीवकुमार पाटील यांनी वाघोली ग्रामपंचायत ही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.पूर्व हवेलीमधील मोठ्या गावाना एकत्र करुन, स्वतंत्र महानगरपालिका तयार होणार असल्याचे कारण पुढे करत यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालण्य़ास नकार दिला होता. मात्र आमदार पवार यांनी यात गेल्या वर्षभरापासून लक्ष घातले होते. ही निर्णय प्रक्रिया आता तातडीने होण्याची गरज आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख