नाही, नाही म्हणत विजयदादा भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य बनले 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे नाही, नाही म्हणत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य बनले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 3 जुलै) जाहीर केलेल्या कार्यकारिणी समितीमध्ये मोहिते पाटील यांना हे पद देण्यात आले आहे.
VijaySinh Mohite Patil elected as BJP's State Special Invited Member
VijaySinh Mohite Patil elected as BJP's State Special Invited Member

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे नाही, नाही म्हणत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य बनले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 3 जुलै) जाहीर केलेल्या कार्यकारिणी समितीमध्ये मोहिते पाटील यांना हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे विजयदादा आता भाजपचे अधिकृत सदस्य बनले आहेत. 

मोहिते पाटील यांना यापूर्वी भाजप प्रवेशाबाबत विचारले असता त्यांचे उत्तर ठरलेले असायचे, मी कोठेही गेलो नाही. मी अधिकृतरित्या भाजपमध्ये गेलेलो नाही. मी अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य आहे, असे ते सांगायचे. भाजपने आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात विशेष निमंत्रितांच्या यादीत विजयदादा यांच्या नावाचा समावेश आहे. 

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकृत भाजप प्रवेश केल्याचे याआधी नाकारले असले तरी त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मात्र मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूज येथे झालेल्या सभेत रणजितसिंह यांच्यासह विजयदादा व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतरही विजयदादा आपण भाजपचे सदस्य नसल्याचे सांगत होते. 

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या कार्यक्रमात विजयदादा उपस्थित होते. तेव्हाही त्यांनी माध्यमाशी बोलताना आपण कोठेही गेलो नाही. आमचा मुलगा भाजपमध्ये गेला आहे. मी अजूनही राष्ट्रवादी सोडली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना येण्यास थोडा वेळ होता. त्या वेळी दूरवर बसलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना शरद पवार यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्याशी पवार यांनी बराच वेळ चर्चाही केली होती. त्या कार्यक्रमानंतर त्यांनी आपण यापूर्वीही शरद पवार यांना दोन ते तीन वेळा भेटल्याचे सांगितले होते. राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर विजयदादा हे पुन्हा राष्ट्रवादीशी जुळून घेणार की काय? अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली होती. 

दुसरीकडे हक्काच्या माढा मतदारसंघातून भाजपने साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकिट दिले होते. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. परंतु रणजितसिंह यांना संधी मिळाली नव्हती. त्याच वेळी गोव्याच्या राज्यपालपदी विजयसिंह मोहिते पाटील यांची नेमणूक होणार, अशीही चर्चा रंगली होती. परंतु त्याही पदाने मोहिते पाटील यांना हुलकावणी दिली होती, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजीची भावना होती. 

काही दिवसांपूर्वी रणजितसिंह यांची विधान परिषदेवर भाजपने निवड केली आहे. त्यानंतर आता तर खुद्द विजयदादा यांना भाजपने विशेष निमंत्रित कार्यकारी सदस्य बनविले आहे, त्यामुळे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर यापुढे येणार नाही. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातून इंदापूरचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नगरमधून वैभव पिचड यांनाही प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नेमले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com