काही महाराज आमच्यातलं मागतायंत, त्यांना धनगराची काठी दाखवू
Vijay Vadettiwar's criticism of MP Sambhaji Raje without mentioning his name

काही महाराज आमच्यातलं मागतायंत, त्यांना धनगराची काठी दाखवू

बावनकुळे यांचे मत हे केंद्र सरकारबाबत होते की राज्य सरकार बाबत, हे तपासून झारीतले शुक्राचार्य नेमके कोण, याचा शोध घेऊ.

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन काम केले. मात्र, अलीकडे काही महाराज तुमच्यातील आरक्षण द्या, असे म्हणतायत. तुम्हाला स्वातंत्रपणे हवे ते आरक्षण घ्या. मात्र, आमच्यातले आरक्षण मागू नका; अन्यथा रस्त्यावर उतरू किंवा धनगराची काठी घेऊन काय करायचे ठरवू, असा इशारा ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिला. (Vijay Vadettiwar's criticism of MP Sambhaji Raje without mentioning his name)

सोलापुरात ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या वतीने ‘ओबीसी निर्धार मेळावा' आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रणिती शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पक्षीय राजकारण बाजूला ठेवत ओबीसींच्या प्रश्नासाठी मी वडेट्टीवार यांच्यासोबत आहे. ओबीसी आरक्षणासाठी सरकारमध्ये विजय वडेट्टीवार हे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र, सरकारमध्येच कोणी तरी झारीतले शुक्रचार्य आहेत, त्यांना शोधण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. त्यावर बोलताना, ‘बावनकुळे यांचे मत हे केंद्र सरकारबाबत होते की राज्य सरकार बाबत, हे तपासून झारीतले शुक्राचार्य नेमके कोण, याचा शोध घेऊ’ असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले. 

दहीहंडी साजरा करण्याबाबत मंत्री म्हणाले की, दहीहंडीने काय मिळवणार, दहीहंडीने फक्त करमणूक होणार, त्यासाठी एवढा अट्टाहास का?त्याऐवजी दहीहंडीचे पैसे वाचवून जे कोरोनामध्ये निराधार झालेत, ज्यांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत, अशांसाठी मदत करा; म्हणजे कृष्ण पावेल, नायतर कृष्ण तुमच्या डोक्यावर हंडी फोडेल. दहीहंडीचा कार्यक्रम हा लाखोंचा असतो. आजच्या मेळाव्यातही लाख लोक आले असते. मात्र,आम्ही थांबवल्यामुळे दोन-चार हजार लोक आले असतील, ओबीसी-व्हिजेएनटीचा लाख-दोन लाखांचा मेळावा झाला असता, त्यातून कोरोनाचा संसर्ग पसरला असता तर मला जबाबदर धरलं असतं.

मंदिर उघडू नये, गर्दी करू नये, या केंद्र सरकारच्या सूचना आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे, असे सांगून त्यांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजप आणि मनसेवर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली.
 
हेही वाचा : अजित पवार, भरणेंना वट्टेडीवारांचे खुले आव्हान; इंदापूरची जागा काँग्रेस लढवणारच 

ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय, त्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्याची शिफारस केंद्राने केली आहे. मात्र, राज्यात नाईट कर्फ्यूबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मागील काही दिवसांत राज्यात रुग्णसंख्येत निश्चितच वाढ होत आहे. त्यामुळे काय उपाययोजना करावी यावर विचार सुरु असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे अहवाल पाठवण्याची सूचना

राज्यातील काही भागात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. काही जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनावरेही वाहून गेली आहेत. या संदर्भात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे सुरु असून, त्यांना तातडीने नुकसानीचे अहवाल पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निकषानुसार तातडीने मदत देण्यात येईल, असे आश्वासनही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या वेळी दिले. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in