...तोपर्यंत राज ठाकरेंसोबत युती नाही : फडणवीस 

राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीय, गैरमराठी लोकांसोबतची अत्यंत टोकाची भूमिका सोडणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आम्ही राजकीयदृष्ट्या जाऊ शकत नाही.
 Until then, there is no alliance with Raj Thackeray: Fadnavis
Until then, there is no alliance with Raj Thackeray: Fadnavis

पुणे : "राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीय, गैरमराठी लोकांसोबतची अत्यंत टोकाची भूमिका सोडणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आम्ही राजकीयदृष्ट्या जाऊ शकत नाही,' अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबतच्या चर्चेला उत्तर दिले. 

देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 23) दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यात त्यांनी काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना एका मित्राच्या घरी भेटल्याचे सांगितले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जवळ जाण्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की राज ठाकरे यांना राजकीय परिस्थिती चांगली समजते. कोठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरून काढावी, याची त्यांना चांगलीच समज आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीवर दुसऱ्यांनी कोणीही सल्ला देण्याची गरज नसते. 

म्हणून राज यांची भेट घेतली 

जोपर्यंत आपण व्यापक भूमिका घेत नाही, तोपर्यंत आपल्या राजकीय विस्ताराला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वाढीला मर्यादा येतात, हे पाहून राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हिताबरोबरच हिंदुत्वाचा विचारही अंगिकारला असावा. त्यातूनच त्यांनी पक्षाचा झेंडा भगवा करण्याबरोबरच हिंदुत्वाची व्यापक विचारसरणी अवलंबली असावी. राज ठाकरे हिंदुत्वाकडे येत आहेत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

मनसेच्या भगव्या झेंडाबाबत 

"मनसेची ज्या वेळी स्थापना झाली. त्या वेळी भगव्या झेंडाची चर्चा झाली होती. परंतु सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर भगव्या झेंड्याऐवजी आम्ही चार रंग असलेला झेंडा स्वीकारला होता. मात्र, त्याच वेळी आम्ही भगव्या झेंड्याचे रजिस्ट्रेशन केले होते, त्यातूनच आम्ही भगवा झेंडा वापरण्याचे ठरविले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 

आमचे सर्वसमावेशक राजकारण 

मनसे परप्रांतियांबाबतची टोकाची भूमिका जोपर्यंत सोडणार नाही. तोपर्यंत आम्हाला त्यांच्यासोबत जाता येणार नाही. कारण आम्हाला सर्वसमावेशक राजकारण करायचे आहे. सर्वांना सोबत घेऊन आम्हाला जायचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

विचाराला विचाराने ट्रोल करावे 

सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, फेक अकाउंटवरून विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांना आम्ही उत्तर देत नाही. मात्र वैयक्तिक अकाउंटला मी प्रतिसाद देतो. विचाराला विचाराने ट्रोल केले पहिजे. टिकेला घाबरून मी आत्तापर्यंत कुणालाही ब्लॉक केलेले नाही. एक मात्र खरे आहे की फेक अकाउंटवरून होणारी टीका अत्यंत असभ्य असते. त्याला आवार घालण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र आले पाहिजे. 

शिवसेना, राष्ट्रवादीचे फेक अकाउंट 

या वेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर एक आरोपही केला. ते म्हणाले की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुमारे दीड लाख फेक अकाउंट तयार कण्यात आले आहेत. यात कॉंग्रेस थोडी मागे आहे. या फेक अकाउंटच्या माध्यमातूनच आमच्यावर टीका होते. अनफेअर लढाईला आम्ही डिफेन्सने उत्तर देतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com