पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांना `मॉक पोल`मध्ये पसंती! - Umesh Patil of NCP favored in mock polls for Pune graduate constituency | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांना `मॉक पोल`मध्ये पसंती!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

आजपर्यंतच्या प्रत्येक युवक प्रदेशाध्यक्षाला शरद पवार साहेबांनी आमदार केले,असल्याने संघटनेसाठी दिवस रात्र कष्ट केलेला कार्यकर्ता म्हणून पवार साहेब नक्की संधी देतील, असा विश्वास उमेश पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे : पुणे विधान परिषद पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे संभाव्य उमेदवार कोण असावा, यासंदर्भात प्रत्यक्ष व्हाईस कॉल द्वारे पाचही जिल्ह्यांतील पन्नास हजार नोंदणीकृत पदवीधर मतदारांचा मॉक पोल घेण्यात आला. तंत्रज्ञानाच्या साह्याने एकाचवेळी पन्नास हजार पदवीधर मतदारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पसंतीचा उमेदवार निवडण्यास सांगितले गेले. यामध्ये प्रत्यक्षात सव्वीस हजार मतदारांनी प्रतिसाद नोंदविला. त्यांच्यासमोर संभाव्य उमेदवार म्हणून उमेश पाटील, अरुण लाड व प्रताप माने असे तीन पर्याय दिले होते. त्यापैकी उमेश पाटील यांना ६०.१ टक्के, अरूण लाड यांना ३०.४ टक्के तर प्रताप माने यांना ९.५ टक्के मतदारांनी पसंती नोंदविली.

यासंदर्भात काही पदवीधर मतदारांशी संवाद साधला असता त्यांनी उमेश पाटील हे एक इतरांच्या तुलनेत सर्वाधिक सक्षम, आश्वासक व प्रभावी उमेदवार आहेत असे सांगितले. पाटील हे एक तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील पुढे आलेले नेतृत्व असून त्यांनी मोठ्या संघर्षाने राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्माण केले आहे, अशा प्रतिक्रिया आल्या.

अधिक आढावा घेतला असता पाटील यांनी राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांचे संघटन जोडले आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश प्रवक्ता म्हणून त्यांची कामगिरी देखील उल्लेखनीय ठरत आहे, सर्व माध्यमांमध्ये आक्रमक पद्धतीने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते आपली भूमिका मांडत असतात या कारणाने युवावर्ग त्यांच्या कडे आकर्षीत झाला आहे.

उमेश पाटील हे स्वतः एम.एसस्सी (कृषी) पदवीधर असून त्यांची शेती व गावगाड्या संदर्भातील समज- उमज चांगली आहे. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून ग्रामीण भागात बेरोजगारांसाठी शेकडो रोजगार मेळावे घेतले. मागील १२ वर्षात जवळपास 60 ते 65 हजार युवकांना खाजगी क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये अध्ययन व अध्यापन केलेले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते संवेदनशील आहेत. त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी ते सतत आग्रही असतात.

पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी जपला आहे व वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेवर व जिल्हा नियोजन मंडळावर ते निवडून देखिल आले आहेत. जिल्हा परिषद सभागृहात त्यांची आक्रमक शैली व अभ्यासू मांडणी पाहता,ते विधिमंडळ सभागृहात सर्व सामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील अशी पदवीधर मतदारांना खात्री वाटते.या शिवाय पवार कुटुंबियांशी त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये त्यांची प्रतिमा एक प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता व नेता अशी आहे.

या सर्व बाबी पुणे पदवीधर मतदारांवर प्रभाव टाकतात व ते पदवीधरातील विविध घटकांना आपलेसे वाटतात.इतर उमेदवारांच्या तुलनेत ते अधिक "डायनॅमिक यूथ लीडर" असल्याने,आपले प्रश्न विधिमंडळामध्ये प्रभावीरीत्या मांडून त्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावतील असा विश्वास मॉक पोल मध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

या संदर्भात उमेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पक्षाने उमेदवारी संदर्भात खाजगी एजन्सी द्वारे सर्वे करावा, पोलीसांकडून गुप्त अहवाल घ्यावा.त्यांच्या रिपोर्ट नुसार जर "निवडून येण्याची सर्वाधिक क्षमता असलेला उमेदवार" म्हणून जर पसंती मिळाली तरच पक्षाने उमेदवारी द्यावी अन्यथा ते स्वत:च उमेदवारी मागणार नाहीत,असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. तरूणांना संधी देण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याची संधी पक्ष नेतृत्वाला असून, आजपर्यंतच्या प्रत्येक युवक प्रदेशाध्यक्षाला पवार साहेबांनी आमदार केले,असल्याने संघटनेसाठी दिवस रात्र कष्ट केलेला कार्यकर्ता म्हणून पवार साहेब नक्की संधी देतील, असा विश्वास उमेश पाटील यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख