भाजप नेते गिरीश महाजन यांना बॉम्ब ने उडविण्याची धमकी...    - Threats to BJP leader Girish Mahajan  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेते गिरीश महाजन यांना बॉम्ब ने उडविण्याची धमकी...   

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

गिरीश महाजन यांना एक करोड रुपये देण्याचे सांग अथवा बॉम्बने उडवून देऊ. त्यानंतर काही वेळाने मोबाईलवर मॅसेज केला.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी फोनवरून देण्यात आली आहे. जामनेर येथे काल (ता.१३) रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन तर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचावेळी त्यांचे स्विय सहायक दीपक तायडे यांना फोन आला गिरीश महाजन यांना एक करोड रुपये देण्याचे सांग अथवा बॉम्बने उडवून देऊ. त्यानंतर काही वेळाने मोबाईलवर मॅसेज केला. त्यातही हाच मजकूर होता, सायंकाळी पाच वाजता ब्लास्ट करण्याची धमकीही त्याने दिली होती, अशी माहितीही तायडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. तो हिंदीत बोलत होता.या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीही तायडे यांनी दिली.

भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांना काल रात्री दहा वेळा धमकीचे कॉल आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी शेलार यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तातडीने पावले उचलत शेलार यांना धमकी देणाऱ्या दोघांना आज मुंब्र्यातून अटक केली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर भाजपने प्रश्न उपस्थित केले होते. आता भाजपच्या नेत्याला धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे. 

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमक्यांचे कॉल आले होते. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांना धमक्यांचे कॉल आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेलार यांना काल रात्री दहा वेळा धमक्यांचे कॉल आले होते. त्यांनी याबाबत वांद्रे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. वांद्रे पोलिसांनी आज दोन आरोपींना मुंब्र्यातून अटक केली आहे. त्यांनी शेलार यांना धमक्यांचे कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी हे कॉल कशासाठी केले, हे अद्याप समोर आलेले नाही. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात भाजपने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. मुंबई पोलीस या प्रकरणी योग्य पद्धतीने तपास करीत नाहीत, असा आरोप भाजपकडून केला जात होता. भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार यात आघाडीवर होते. त्यांनी या प्रकरणी शिवसेनेला राज्यातील महाआघाडी सरकारला लक्ष्य केले होते. 

आता मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजप नेत्याला धमक्या देणाऱ्या आरोपींना पोलिसांनी 24 तासांच्या आता अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी प्रत्यक्ष कृतीतून त्यांची कार्यक्षमता दाखवून दिली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

अभिनेत्री कंगना राणावतवर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनाही आधी धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कथित हस्तकाला दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोलकत्यातून अटक केली होती. पलाश बोस असे त्या आरोपीचे नाव होते. त्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानीही धमकीचे दूरध्वनी केल्याचे समोर आले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख