Thackeray and I know what Parner's subject is: Sharad Pawar | Sarkarnama

पारनेरचा विषय काय आहे, हे मला आणि ठाकरेंना माहीत आहे : शरद पवार 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 7 जुलै 2020

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या पारनेरमधील (जि. नगर) नगरसेवकांच्या पक्षांतरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. 7 जुलै) भाष्य केले. पारनेरमधील नगरसेवक हा राज्याचा आणि देशाचा विषय होऊ शकत नाहीत. हे मला आणि ठाकरे यांनाही माहिती आहे, असे पवार यांनी पुण्यात सांगितले. 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या पारनेरमधील (जि. नगर) नगरसेवकांच्या पक्षांतरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. 7 जुलै) भाष्य केले. पारनेरमधील नगरसेवक हा राज्याचा आणि देशाचा विषय होऊ शकत नाहीत. हे मला आणि ठाकरे यांनाही माहिती आहे, असे पवार यांनी पुण्यात सांगितले. 

गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील पारनेर नगरपालिकेतील पाच नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत झाला होता. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी थेट अजित पवार यांना फोन करून आमचे नगरसेवक माघारी पाठवा, असा निरोप दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

याशिवाय इतर नेत्यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त करून या प्रकरणी अजित पवारांना विचारणा करण्यात यावी, असा सूर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लावला होता. नीलेश लंके हे पूर्वी शिवसेनेत होते. परंतु विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत लंके यांनी शिवसेना नेते, विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष विजय औटी यांचा पराभव केला होता. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या पाच नगरसेवकांना लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. 

महाआघाडीतील सहकारी पक्षाने नगरसेवक पळविल्याने शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याच विषयावर आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. तेव्हा शरद पवार म्हणाले की, ही फार छोटी गोष्ट आहे. पारनेरचे नगरसेवक हा राज्याचा आणि राष्ट्रीय प्रश्‍नांचा घटक होऊ शकत नाही. हे मला आणि ठाकरे यांना माहीत आहे. 

पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांचे काय होणार, चेंडू अजितदादांच्या कोर्टात?

 नगर : पारनेेर नगर पंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यपातळीवर उमटले आहेत. राज्याच्या सत्तेत दोन्ही पक्ष असल्याने एकमेकांत फोडाफोडी करू नये, असे संकेत असताना झालेली फोडाफोड नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. याबाबत दोन्हीही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बैठका झडत आहेत. त्यामुळे या पाच नगरसेवकांची पुन्हा घरवापसी होणार का, याबाबत जिल्ह्याला उत्सुकता आहे.

दरम्यान, त्यांना परत पाठवायचे की नाही, याचे सर्वाधिकार राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार असल्याने हा वादाचा चेंडू आता अजितदादांच्या कोर्टात असल्याचे मानले जाते.

पारनेर नगर पंचायतीची निवडणूक आगमी तीन-चार महिन्यांवर आली आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर नगरसेवक फोडाण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पारनेरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तोही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. आघाडीचा धर्म पाळण्याचे संकेत डावलून पवार यांनी या नगरसेवकांना पक्षात घेतलेच कसे, हाच मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित नगरसेवक भाजपमध्ये जाणार होते, भाजपची ताकद वाढू नये, म्हणून त्यांना राष्ट्रवादीत घेतल्याचा खुलासा आमदार लंके यांनी केला असला, तरी हे लोकांना रुचले नाही. पवार यांचीही त्यांना पक्षात घेण्याची तयार नव्हती, तथापि, नगरसेवकांच्या आग्रहामुळे पक्षांतर झाले असल्याचेही स्पष्ट झाले. परंतु राजकारणात अशा घडामोडी घडतच असतात, हे सर्वसामान्यांनी जाणून घेतले. 

या घडामोडीत भाजपच्या काही नेत्यांनी मात्र संबंधित नगरसेवक आमच्या संपर्कात नसल्याचे सांगून हात झडटकले. दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी संबंधित नगरसेवकांना परत पाठवावे, असा निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. याबाबत रात्री उशिरापर्य़ंत घलबते सुरू असल्याचे समजते. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाल्याचे दिसून येत नाही. आज मात्र याबाबत दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख