"सुप्रियाताई, एक सेल्फी इस्लामपूर-सांगली रस्त्याचा काढा .."  - Take a selfie on Sangli-Peth road Statement to Supriya Sule from Citizen Development Forum | Politics Marathi News - Sarkarnama

"सुप्रियाताई, एक सेल्फी इस्लामपूर-सांगली रस्त्याचा काढा .." 

शेखर जोशी
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

'एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यासोबत काढा, या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा,' असे आवाहन साखळकरांनी केले आहे.

सांगली : खासदार सुप्रिया सुळे यांचा दोन-तीन वर्षांपूर्वीचा "सेल्फी वुईथ खड्डा' हा राजकीय टोलेबाजीचा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. महाराष्ट्रातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यासोबत त्या सेल्फी काढत आणि फेसबुकवर अपलोड करत होत्या. त्याचा चांगलाच परिणाम झाला होता. अनेक खड्डे बुजवले गेले होते. अनेक रस्त्यांची कामेही झाली होती. 

त्यावेळी भाजपची सत्ता होती. आता राष्ट्रवादीच्या पुढाकाराने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. नेमका हाच मुद्दा पकडत येथील नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना निवेदन पाठवले आहे. 

'एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यासोबत काढा, या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा,' असे आवाहन साखळकरांनी केले आहे. हे आवाहन त्यांनी फेसबुकच्या माध्यमातूनही केले आहे. सोबत सुप्रिया सुळे यांचा एक फोटोही अपलोड केला आहे, जो सेल्फी वुईथ खड्डाचा आहे. त्यामुळे त्याची सांगलीत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

सांगली ते पेठ रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे वर्ग झाला आहे. त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 एच असा क्रमांक मिळाला आहे. हा रस्ता रत्नागिरी ते नागपूर या नव्या राष्ट्रीय महामार्गाला पुणे ते बंगळूरू या राष्ट्रीय महामार्गाशी जोडतो. गेली कित्येक वर्षे या रस्त्याने मरणयातना सहन केल्या आहेत. कित्येक बळी येथे गेले आहेत.
जयंत पाटील हे जिल्ह्याचे सुपरपॉवर नेते असतानाही त्यांना या रस्त्याचा विषय लवकर संपवता आला नाही. आता राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता वर्ग झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग तेथील खड्डेही भरायला तयार नाही, हे मोठे दुखणे आहे. 

संबंधित लेख