सीबीएसईच्या धर्तीवर दहावी- बारावीच्या अभ्यासक्रमात कधी कपात होणार? - student demands decision of minimize syllabus make fast  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

सीबीएसईच्या धर्तीवर दहावी- बारावीच्या अभ्यासक्रमात कधी कपात होणार?

उमेश घोंगडे  
बुधवार, 8 जुलै 2020

अभ्यासक्रम शिकवताना नेमका कोणता धडा, कोणता अभ्यासक्रम शिकवायचा आणि कोणता शिकवायचा नाही याबाबत कोणतीच कल्पना नसल्याने शिक्षक आणि शाळा तसेच विद्यार्थी आणि पालकांची मोठी अडचण झाली आहे.

पुणे : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने (सीबीएसई) अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात निर्णय जाहीर केला आहे. सीबीएसईच्या धर्तीवर राज्य मंडळ दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात कधी कपात करणार याकडे या दोन्ही वर्गातील विद्यार्थी पालकांचे लक्ष लागून राहीले आहे. अभ्यासक्रमातील नेमका कोणता भाग वगळणार यावर दहावी व बारावीतील अभ्यासक्रमाचे नियोजन अवलंबून असल्याचे मंडळाने लवकरात लवकर किती व कोणता अभ्यासक्रम वगळला याची घोषणा करावी, अशी मागणी विद्याथी-पालक व शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता पहिल्या सत्रात शाळा सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यावर राज्य मंडळाची समिती काम करीत आहे. या समितीकडून लवकर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. वास्तविक जून महिन्याच्या शेवटी अभ्यासक्रमातील कोणता भाग वगळण्यात येईल, हे स्पष्ट करण्यात येणार होते. मात्र, जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी या संदर्भात स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे आधीच वर्ग होत नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वास्तविक जून महिन्याच्या शेवटी राज्य सरकारने अभ्यासक्रमातील कपातीची स्पष्टता केली असती तर विद्यार्थी-पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन यांना त्यादृष्टीने वार्षिक नियोजन करता येणे शक्य झाले असते.

राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थितीत प्रत्यक्ष वर्ग लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर दहावी बारावीबरोबरच पहिली ते नववी व लवकरच सुरू होणाऱ्या अकरावीच्या अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता येण्याची गरज आहे. सध्या ग्रामीण भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेचा मोठा प्रश्न आहे. ‘ऑनलाइन’ शिक्षण शहरी भागात शक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात ही मोठी अडचण आहे. दहावी-बारावीच्या अनेक शाळातील वर्ग ऑनलाइन सुरू होऊ शकले नाहीत. वारंवार खंडीत होणारी वीज आणि इंटरनेटचे अपुरे नेटवर्क ही ग्रामीण भागातील समस्या आहे. त्यातच अभ्यासक्रम शिकवताना नेमका कोणता धडा, कोणता अभ्यासक्रम शिकवायचा आणि कोणता शिकवायचा नाही याबाबत कोणतीच कल्पना नसल्याने शिक्षक आणि शाळा तसेच विद्यार्थी आणि पालकांची मोठी अडचण झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ तसेच राज्य परीक्षा मंडळाच्यावतीने या संदर्भात लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. राज्य मंडळ दहावी आणि बारावीचा यावर्षीचा निकाल जाहीर करण्याची तयारी करीत आहे. मात्र, त्याच बरोबर दहावी आणि बारावीच्या पुढील वर्षासाठीचा अभ्यासक्रम कपातीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी सर्व संबंधित घटकांकडून करण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख