कर्नाटक सरकार नरमले : मणगुत्तीत सात दिवसांत शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना 

मणगुत्ती (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथे बस स्थानकाजवळ बुधवारी (ता. 5 ऑगस्ट) प्रतिष्ठापना करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (ता. 7) रात्री हटविण्यात आला होता. त्यामुळे मणगुत्ती गावासह बेळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्याचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रातही उमटले.
A statue of Shivaji Maharaj will be installed at Mangutti in seven days
A statue of Shivaji Maharaj will be installed at Mangutti in seven days

निपाणी, हुक्केरी (बेळगाव) : मणगुत्ती (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथे बस स्थानकाजवळ बुधवारी (ता. 5 ऑगस्ट) प्रतिष्ठापना करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (ता. 7) रात्री हटविण्यात आला होता. त्यामुळे मणगुत्ती गावासह बेळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्याचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रातही उमटले. 

विविध जिल्ह्यांतील शेकडो शिवभक्तांनी रविवारी (ता. 9 ऑगस्ट) मणगुत्तीत एकवटून पुतळ्याची त्याच जागी प्रतिष्ठापना करण्याची मागणी करत आंदोलन केले. अखेर कर्नाटक सरकारने नमते घेतल्याने दुपारी तहसीलदार, पोलिस अधिकारी तसेच मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी या तिन्ही गावातील पंचाची बैठक झाली. त्यामध्ये येत्या सात दिवसांत कायदेशीर बाबींची पूर्तता करून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची समारंभपूर्वक प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी जल्लोष केला. 

मणगुत्ती बस स्थानकानजीक शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. त्याला काही संघटनांनी विरोध झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर रितसर परवानगी मिळवून पुतळ्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचे आश्‍वासन आमदार सतीश जारकिहोळी यांनी दिल्यानंतर पुतळा उतरवून ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला. मात्र, गावातील तणाव निवळला नाही. त्याचे लोण कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसह महाराष्ट्रातही पसरले. त्यामुळे, गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यमकनमर्डी पोलिस ठाण्यामार्फत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. 

मात्र, रविवारी सकाळपासूनच कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी गावात दाखल होण्यास सुरवात केली. त्यात महिलांची संख्या मोठी होती. बघता बघता बस स्थानक चौक गर्दीने फुलून गेला. महिलांनी पुतळ्याच्या चबुतराजवळ ठिय्या मारला. त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केल्याने संपूर्ण गाव दणाणून गेले. 

हुक्केरीचे पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेतली. रितसर परवानगीनंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही जमाव वाढतच गेला. शिवपुतळ्याच्या प्रतिष्ठापनेचा निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार सर्वांनी केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दुपारी जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी, तहसीलदार अशोक गुराणी व अन्य अधिकारी दाखल झाले. 

अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रेड्डी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी या तिन्ही गावांतील प्रमुख नेते व पंच मंडळींची बैठक घेतली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रतिष्ठापनेबाबत सर्वांचे एकमत असल्याचे सांगण्यात आले. तसेच, सात दिवसांत कायदेशीर बाबींची पूर्तता करून समारंभपूर्वक पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती चौकात जमलेल्या शिवप्रेमींना देण्यात आली. 

...तर स्वत:च प्रतिष्ठापना करू 

पुतळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी व तिन्ही गावांतील प्रमुखांची बैठक लवकरच होणार आहे. शिवप्रेमींनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. मात्र, सात दिवसांत शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना न झाल्यास स्वत:च पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याचा इशारा शिवप्रेमींकडून देण्यात आला. 

मणगुत्तीतील महिलेवर हल्ला 

राष्ट्रीय महामार्गावर मणगुत्तीतील एका महिलेवर काही कन्नड लोकांनी हल्ला केला. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. मणगुत्ती व अन्य दोन गावांतील वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com