Start repurchasing maize and sorghum immediately    | Sarkarnama

राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर.. 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या घरात मका व ज्वारी पडून आहे. शासनाने खरेदी केंद्र सुरू केली नाही. तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

जळगाव : राज्य सरकारने मका व ज्वारीची हमीभावाने पुन्हा खरेदी त्वरीत सुरू करावी, अन्यथा ५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी राज्यातील आपल्या पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.

जिल्हा बँकच्या संचालक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले कि, राज्य सरकारने मका व ज्वारी हमी भावाने खरेदी करण्याचे केंद्र जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू केले. मात्र, काही दिवसांनी ही केंद्र बंद करण्यात आली. अशा प्रकारे तीन वेळा ही केंद्रे बंद करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या घरात मका व ज्वारी पडून आहे. शासनाने खरेदी केंद्र सुरू केली नाही. तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.जिल्ह्यात २० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली मात्र केवळ चार हजार शेतकऱ्यांचाच मका खरेदी करण्यात आला. 

अद्यापही सोळा हजार शेतकऱ्यांच्या घरात मका आहे. राज्यात आज मका व ज्वारी खरेदीचा मोठा गंभीर प्रश्‍न आहे. शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, मका व ज्वारी खरेदी तातडीने करावी याबाबत कोणताही नेता बोलण्यास तयार नाही, हीच खरी शोकांतिका आहे. याबाबत आता सरकारने त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी नोंदणी केली असेल व मोजणी झाली नसेल तसेच ज्या शेतकऱ्यांचा मका नोंदला असेल परंतु मोजणी केली नेसल अशा शेतकऱ्यचे पंचनामे करून त्यांच्या बँक खात्यावर हमी भावाच्या फरकाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करावी. अन्यथा नोंदणी झालेला मका व ज्वारी मोजणी करावा. पाच ऑगस्टपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत. असा ईशराही त्यांनी दिला आहे. यावेळी एरंडोल धरणगाव तालुका शेतकी संघाचे अध्यक्ष रमेश राजाराम पाटील, माजी अध्यक्ष रविंद्र बाबुराव चव्हाण उपस्थित होते.
 Edited  by : Mangesh Mahale 

हेही वाचा : राज्यात सर्वाधिक दुध दर 'या' डेअरीचा  
 
कोल्हापूर : राज्यात सर्वाधिक दुध दर "गोकुळ'कडून दिला जातोय. प्रत्येक वेळी राजकीय द्वेषानं पछाडलेल्या पालकमंत्र्यांनी आधी माहिती घ्यावी आणि सर्वाधिक दर देणाऱ्या "गोकुळ' च्या संचालकांचा सत्कार करावा, असे आव्हान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. दुध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपने केलेले आंदोलन म्हणजे केवळ स्टंट आहे, असा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. तर गोकुळनं शेतकऱ्याला जादा दर द्यावा, असेही आवाहन केलं. त्याला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले. "आमचं ठरलंय' असे म्हणणाऱ्या टोळक्‍यानं आता पर जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांना आपल्या खाजगी रूग्णालयातून लुटमार करायचे ठरवलंय, असा टोलाही महाडिक यांनी हाणला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख