मराठवाडा पदवीधरच्या विजयाने राज्यातील सत्ता परिवर्तनाची सुरूवात करा.. - Start the change of power in the state with the victory of Marathwada graduates | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधरच्या विजयाने राज्यातील सत्ता परिवर्तनाची सुरूवात करा..

जगदीश पानसरे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी निवडणूक मनावर घेतली आहे, ती पाहता आपण आपल्या हक्काची ही जागा नक्कीच खेचून आणू, असा मला विश्वास आहे. विरोधी उमेदवार कर्मचाऱ्यांच्या बळावर निवडणूक लढवत आहे, तर आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर. त्यामुळे पदवीधरमध्ये विजय मिळवत राज्यातील सत्तातंराच्या दिशेने आपण पाऊल टाकूयात.

औरंगाबाद ः राज्यात पाच ठिकाणी पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, पण चर्चा फक्त मराठवाड्यातील शिरीष बोराळकरांच्या निवडणूकीची आहे. महाराष्ट्रात मराठवाड्याची चर्चा अधिक असते, तेव्हा आपल्या हक्काचा हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी बोराळकरांना निवडूण आणा आणि राज्यातील सत्ता परिवर्तनाला सुरूवात करा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे यांनी केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शहरात पदाधिकाऱ्यांना मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी नाराज आहे, इथे आले नाही, तिथे गेले नाही, अशा अफवांवर आता विश्वास ठेवू नका. देवेंद्रजी यांच्या सोबत मी पत्रकार परिषदेत बसलेली असतांना पत्रकारांनी विचारले माझी भूमिका काय असले?  मी ज्या मंचावर आहे, ज्या भाजपची राष्ट्रीय सचिव आहे, त्या पक्षाची जी भूमिका तीच माझी भूमिका असेल, वेगी कशी असू शकेल. पोटात एक आणि ओठात एक अशी माझी शिकवण नाही, गोपीनाथ मुंडेची ती शिकवण नाही, असे पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितले.

शिरीष बोराळकरांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून या निवडणूकीची राज्यभरात चर्चा आहे. ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आपले नेते अमित शहा यांनी जी बुथप्रमुखांची रचना पक्षात आणली आहे, ती इतकी प्रचंड यशस्वी आहे, की आता इतर पक्ष देखील त्याची काॅपी करायला लागले आहेत. तेव्हा या बुथप्रमुखांच्या जोरावरच आपण ही निवडणूक मोठ्या मताधिक्यांनी जिंकणार आहोत, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण बिहारची विधानसभा निवडणूक जिंकलो, इतर राज्यात देखील पक्षाला मोठे यश मिळाले. त्याबद्दल आनंद व्यक्त करा, फटाके फोडा, पण त्या निवडणकीचा आणि पदवीधरचा काही संबंध नाही. गाफील राहू नका, निवडणूक सोपी नाही, पण ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी निवडणूक मनावर घेतली आहे, ती पाहता आपण आपल्या हक्काची ही जागा नक्कीच खेचून आणू, असा मला विश्वास आहे. विरोधी उमेदवार कर्मचाऱ्यांच्या बळावर निवडणूक लढवत आहे, तर आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर. त्यामुळे पदवीधरमध्ये विजय मिळवत राज्यातील सत्तातंराच्या दिशेने आपण पाऊल टाकूयात, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख