मुख्यमंत्र्यांकडून विद्याधर अनासकरांचा विशेष गौरव...

अवघ्या तीन वर्षात यशाचे शिखर गाठल्याबद्दल बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांचा मंत्री समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विशेष गौरव करण्यात आला.
Vidyadhar Anaskar.jpg
Vidyadhar Anaskar.jpg

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातल्या सहकाराला पतपुरवठा करणारी प्रमुख शिखर बँक. सहकार आणि पर्यायाने राजकारण्यांच्या दृष्टीने ही महत्वाची संस्था असल्याने सहकाराच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या सर्वपक्षीयांसाठी ही बँक म्हणजे सर्वकाही आहे.  

या बँकेने गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी वार्षिक उलाढाल, उच्चांकी नफा, शून्य टक्के एनपीए मिळवत १०९ वर्षातला इतिहास घडवला आहे. सहकारातल्या या शिखर बँकेने अवघ्या तीन वर्षात यशाचे शिखर गाठल्याबद्दल बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांचा मंत्री समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विशेष गौरव करण्यात आला.

एकेकाळी अडचणीत आलेल्या या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून २०११ मध्ये तत्कालिन सरकारने प्रशासक नेमले होते. तीन वर्षापूर्वी तत्कालिन सरकारने प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी अनासकर यांची नेमणूक केली. या तीन वर्षात बँकेने आधीच्या सर्व अडचणींवर मात करत सर्व आघाड्यावर मोठे यश मिळवत आधीच्या वर्षीचे स्वत:चेच सर्व विक्रम मोडले आहेत.

२० हजार ८४९ कोटी रूपयांच्या ठेवी बँकेकडे आहेत. २० हजार ८१७ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचे एकुण व्यवहार ४१ हजार ६६६ कोटी रूपयांचा असून एनपीए शून्य टक्के आहे.  बँकेकडे चार हजार ७८४ कोटी रूपये स्वनिधी आहे तर गेल्या वर्षात बँकेने तब्बल ३२५ कोटी रूपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.

सहकारी बँकींगबद्दल अविश्‍वासाचे वातावरण असताना बँकेने मिळविलेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी अनासकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.  विशेष बाब म्हणजे मंत्री समितीच्या बैठकीत मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी या कामगिरीबद्दल अनासकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला .

याला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमोदन देत अनासकर यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख करीत सहकारासाठी राज्य बँकेचे काम दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे म्हटले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब जाधव तसेच कृषी मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, शंभूराज देसाई यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

या संदर्भात संपर्क साधला असता बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अनासकर म्हणाले, ‘‘बँकेने ऐतिहासिक कामागिरी केली असली तरी या यशात माझ्या एकट्याचा वाटा नाही. प्रशासकीय मंडळातील माझे सर्व सहकारी, बँकेचे सभासद, ठेवीदार, भागधारक, नाबार्ड, आरबीआय, सहकार विभाग, राज्य सरकार तसेच बँकेचे सर्व आधिकारी व कर्मचारी या साऱ्यांचा यशात सहभाग आहे. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा जपत राज्यातला शेवटचा शेतकरी समोर ठेऊन आम्ही काम करीत आहोत.’’
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com