solapur sp manoj patil appeals about pandharpur curfew | Sarkarnama

उद्या दुपारपासून पंढरपुरमध्ये संचारबंदी: SP मनोज पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

पाच जिल्ह्यातून  येणार आहेत. या प्रत्येक पालखीबरोबर 20 वारकरी असतील, त्यांची कोविड-19 ची तपासणी केलेली असावी. वृद्ध वारकऱ्यांना पालखीसोबत आणू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत

सोलापूर : आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात उद्या, मंगळवार (दि. 30) दुपारी दोन वाजल्यापासून ते गुरुवारी, दोन जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडता येणार नाही.

पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते. आषाढी वारीत संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  नऊपालख्यांना अटी-शर्थीवर परवानगी दिली आहे. या पालख्या 30 जूनच्या रात्री 9 वाजेपर्यंत पंढरपुरात पोहोचतील. पालख्यांसोबत मानाचे 20 वारकरी असतील. त्यांची कोविड-19 चाचणी झालेली असावी, वृद्ध वारकऱ्यांना वारीत सामील होता येणार नाही. 1 जुलैला पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. यावेळी मंदीर समितीने ठरविलेले मानाचे वारकरीही असतील. स्नान करण्यास पाच वाजेनंतर परवानगी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मानाच्या नऊ पालख्या

पाच जिल्ह्यातून  येणार आहेत. या प्रत्येक पालखीबरोबर 20 वारकरी असतील, त्यांची कोविड-19 ची तपासणी केलेली असावी. वृद्ध वारकऱ्यांना पालखीसोबत आणू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू, संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण, संत नामदेव महाराज संस्थान, पंढरपूर, विठ्ठल-रूख्माई संस्थान, कौंडण्यपूर, चांगावटेश्वर देवस्थान, सासवड. दोन जुलैला सकाळपासून मानाच्या पालख्यांची विठ्ठल-रूक्मिणी मातेस भेटीचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर पालख्यांचे पंढरपूर येथून संबंधित संस्थानकडे प्रस्थान होणार आहे.

नागरिकांनी दर्शन व चंद्रभागेत स्नानासाठी विनाकारण गर्दी करू नये. केवळ मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती आणि मानाच्या पालखी प्रमुखांना प्रवेशपत्रिकेसह पादुकांसह मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. केवळ कर्तव्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांना परवानगी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वारीमध्ये महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 1500 पोलीस आणि एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी असणार आहे.

माध्यम प्रतिनिधींनी पंढरपूर परिसरात गर्दी करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून वृत्त संकलन करावे. मंदिरातील महापुजेचे वृत्त आणि व्हिडीओ, फोटो इत्यादींचे कव्हरेज प्रसार माध्यमांना इमेलद्वारे देण्याची व्यवस्था जिल्हा माहिती कार्यालयाने केली आहे.

भाविकांना लाईव्ह दर्शनाची सोय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. वारकरी व भाविकांनी पालख्या व विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी येऊ नये. घरातूनच लाईव्ह दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मंदिर समितीने www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर आणि जिओ टीव्ही, टाटा स्काय डिशवर श्रीचे लाईव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख