Six and a half thousand corona patients increased in a single day in the state | Sarkarnama

राज्यात एकाच दिवसात वाढले साडेसहा हजार कोरोना रुग्ण 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 5 जुलै 2020

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून रविवारी (ता. 5 जुलै) दिवसभरात सहा हजार 555 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख 6 हजार 19 झाली आहे. 

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून रविवारी (ता. 5 जुलै) दिवसभरात सहा हजार 555 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख 6 हजार 19 झाली आहे. 

उपचारादरम्यान 151 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 8 हजार 822 वर पोचला आहे. आज (रविवारी) 3 हजार 658 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 740 झाली आहे. सद्यस्थितीला राज्यात 86 हजार 40 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 3 हजार 658 जणांमुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.08 टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, रविवारी नोंद झालेल्या 151 मृत्यूंपैकी मुंबईतील 69, ठाणे जिल्ह्यातील 20, पुणे मंडळ येथील 35, औरंगाबाद मंडळातील 11, नाशिक मंडळातील 16 मृत्यूंचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील मृत्युदर 4.27 टक्के इतका झाला आहे. 

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 6 हजार 619 (18.57 टक्के) जणांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात 6 लाख 4 हजार 463 नागरिक घरीच विलगीकरणात असून इतर 46 हजार 62 नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

मुंबईत 1311 नवीन रुग्ण 

मुंबईत रविवारी एक हजार 311 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 84 हजार 125 झाली आहे. दिवसभरात 69 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा चार हजार 896 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात दोन हजार 420 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 

मुंबईत रविवारी नोंद झालेल्या 69 मृत्यूंपैकी 61 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 42 पुरुष, तर 27 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी चौघांचे वय 40 च्याखाली होते. 43 रुग्ण 60 वर्षांवरील होते. तसेच 22 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. 

रविवारी 932 नवीन संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 58 हजार 419 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आजपर्यंत 55 हजार 883 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

रुग्ण दुपटीचा दर 43 दिवसांवर 

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 66 टक्के इतका आहे; तर 4 जूनपर्यंत एकूण तीन लाख 54 हजार 649 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. 28 जून ते 4 जुलैदरम्यान कोव्हिड रुग्णवाढीचा दर हा 1.63 इतका आहे. रुग्ण दुपटीचा दर हा 43 दिवसांवर गेला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख