राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर गुन्हा दाखल... - ShivJayanti Crime filed against NCP MLA Amol Mitkari | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर गुन्हा दाखल...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुटासा गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये 100 पेक्षा जास्त ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी असे तीनशे जणांवर दहीहंडा पोलीस ठाण्यामध्ये काल सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन त्याच पक्षातील आमदाराकडून होत असल्यामुळे इतरांनी का नियम पाळावे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने या संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन आधीच राज्यातील जनतेला केले. अकोला, अमरावती, नागपूर यासह इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक इतर जिल्ह्यात पेक्षा दुपटीने वाढत असल्याने या जिल्ह्यांमध्ये कडक कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभागी होऊ नये, या संदर्भात आदेश काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आधीच सांगितले होते. 

या सरकारच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनीच कोरोना प्रतिबंधक नियम तोडण्यात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कुटासा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढली. सर्रासपणे राज्य सरकारच्या नियमांचे आदेशाचे तसेच कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्याच्या नियमांचे उल्लंघन आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. या संदर्भात दहीहंडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीनुसार आमदार अमोल मिटकरी व तीनशे ग्रामस्थांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असताना त्याच पक्षातील आमदार जर राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल तर सामान्य नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आमदार मिटकरी यांच्या वर जरी गुन्हा दाखल झाला असला तरी या संदर्भात पुढील कारवाई होईल का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यामुळे आमदारांच्या या कृत्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवरच पक्षाकडून ही कारवाई होण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख