दानवेंच्या वक्तव्यावरून भारताने चीनवर हल्ला करावा..राऊतांचा टोला  - Shiv Sena mp Sanjay Rahut criticizes bjp leader Raosaheb Danve statement | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेंच्या वक्तव्यावरून भारताने चीनवर हल्ला करावा..राऊतांचा टोला 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई : शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंच्या या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
 
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "आम्ही रावसाहेब दानवे यांचे आभारी आहोत. त्यांनी शेतकरी आंदोलनामध्ये चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.

दानवे यांच्या विधानाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. दानवे यांच्याकडे याबाबत काहीतरी सबळ पुरावे असले पाहिजे म्हणून त्यांनी हे विधान केलं असावं. दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच. दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून भारताने चीनवर हल्ला केला पाहिजे."

'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेचे केले आहे. याबाबत त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही दावनेवर याविषयावरून निशाणा साधला आहे. 

रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दानवे हे मूळचे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे याची सर्वात आधी डीएनए चाचणी करावी लागेल, पुन्हा असे वक्त्यव्य त्यांनी करू नये. या आधी दानवे यांच्या घरावर आम्ही गेलो होतो, आता दानवेंना घरात घुसून मारावं लागेल का, असे बच्चू कडू म्हणाले.

"उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे म्हणूनच पाहिले पाहिजे. यामध्ये बाहेरील शक्ती असेल तर गृहविभागाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काय म्हणाले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत मत नाही," असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. 
 
याबाबत भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील म्हणाले, "कृषी विधेयकामुळे देशातील शेतकरी नाराज नाही किंवा सरकारवर रागावलाही नाही. कालच्या बंदचा कसा फज्जा उडाला हे सर्वांनी पाहिले आहे. मोटार सायकल घेवून नेहमीच्या स्टाईल धाकधपट करुन फिरले म्हणजे असे झाले नाही. बिहार, महाराष्ट्र, मध्यमप्रदेश, राजस्थानमध्ये कोठेही आंदोलन झाले नाही. मग शेतकरी नाराज आहे, हे कसे समजायचे. त्यामुळे, जे आंदोलन होत आहे. ते शेतकऱ्यांचेच समजूनच त्याला सामोरे गेले पाहिजे. यामध्ये काही बाहेरची शक्ती वापरली जात असेल तर ती गृहविभागाकडून तपासली जाईल. पण दानवेंचे व्यक्त केलेले मत हे भारतीय जनता पार्टीचे नसून त्यांचे वैयक्तिक आहे." 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख