नीलेश राणे म्हणतात ; शिवसेना आता बलात्कारी, खंडणीखोर,  ड्रग्जवाल्यांची झाली... - Shiv Sena has now become a rapist,  drug addict  | Politics Marathi News - Sarkarnama

नीलेश राणे म्हणतात ; शिवसेना आता बलात्कारी, खंडणीखोर,  ड्रग्जवाल्यांची झाली...

उमेश घोंगडे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

‘अति तिथे माती’ ही मराठीतील म्हण शिवसेनेसाठी लागू पडते, असे सांगत शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असे राणे यांनी म्हटले आहे.

पुणे : काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे, या शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. बलात्कारी, ड्रग व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, चमडी केस ही आजच्या शिवसेनेची ओळख असून ‘अति तिथे माती’ ही मराठीतील म्हण शिवसेनेसाठी लागू पडते, असे सांगत शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असे राणे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या मुंबईतील एका उपनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून हा मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी आहे. या युवा नेत्याला ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांची झोप उडाली आहे. या संबंधीच्या बातम्या मुंबईतील वर्तमान पत्रात आल्या आहेत. त्याचा संदर्भ देत राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. लढाऊ मराठी तरूणांची शिवसेना आता बलात्कारी, खंडणीखोर आणि ड्रग्ज वाल्यांची झाली आहे, अशी टिका यांनी केली आहे. 

शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण असो वा त्या निमित्ताने सुरू झालेले अभिनेत्री कंगणा राणावत व खासदार संजय राऊत यांच्यातील ट्विटरवॉर यातील सर्वच वादावर राणे यांनी भूमिका घेतली आहे.

राणे हे माजी खासदार आहेत. त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री नारायण राणे व धाकटे बंधू नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीकडून अनुक्रमे खासदार व आमदार आहेत. शिवसेना व राणे यांच्यातील विळ्याभोपळ्याचे प्रेम सर्वश्रृत आहे. स्वत: नारायण राणे हेदेखील शिवसेनेवर टोकाची टीका करतात. सुशांतसिंह प्रकरणातही नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही माहिती दिली होती.

कंगना राणावत व संजय राऊत यांच्या वादातही नीलेश राणे यांनी राऊत यांच्यावर तसेच राज्य सरकारवर थेट टीका केली होती. मात्र, या साऱ्या प्रकरणात त्यांनी मुंबई पोलिसांचे समर्थन केले होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप यात राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यातच शिवसेना उपनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात राणे अधिकच आक्रमक झाले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख