फडणवीस काहीही बोलून प्रसिद्धी मिळवतात 

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात फडणवीस यांना लगावला.
Sharad Pawar's criticism of Devendra Fadnavis
Sharad Pawar's criticism of Devendra Fadnavis

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात फडणवीस यांना लगावला. 

"ज्यांना जनतेने बाजूला केले आहे, अशा लोकांची आपण कशाला नोंद घ्यायची,' अशी उपहासात्मक टीकाही पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. 

शरद पवार हे आज (ता. 27 जून) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच ऑफर होती, असा गौप्यस्फोट करून फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावर शरद पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती. याचबरोबर भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवरील टीका केली आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पडळकर यांनी केलेल्या टिकेला स्वतः शरद पवार काय उत्तर देणार? याची उत्सुकता होती. 

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काही ना काही बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. या पेक्षा यात दुसरे काहीही नाही. 

गोपीचंद पडळकर यांच्याबाबत पवार म्हणाले की, माढा मतदारसंघात त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली, त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली, त्या ठिकाणीही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच, सांगली लोकसभेची निवडणुकीतही त्यांना जनतेने स्वीकारले नाही. ज्यांना जनतेनेच बाजूला केले आहे, अशा लोकांची आपण कशाला नोंद घ्यायची, अशा शब्दांत पडळकर यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्या टिकेकडे शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. 
 

पडळकरांनी माफी मागावी; भाजप नेते लक्ष्मण ढोबळेंचा सल्ला 

पुणे : "सर्वच राजकीय पक्ष शरद पवार यांना दैवत मानून काम करतात. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्याबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. पडळकर यांनी शरद पवार यांची माफी मागावी आणि हा निर्माण झालेला वाद संपुष्टात आणावा," असे मत भाजपचे नेते, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले. 

"पन्नास वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या एका वंदनीय नेत्यांच्याबद्दल असे विधान करणे दुर्दैवी आहे. चुकीचे आहे. राजकारणात टीका करावी लागते, पण टीका सभ्य भाषेत करायला हवी. पडळकर यांना सभ्य शब्दांत टिका करता आली असती."असेही ढोबळे म्हणाले. 

"पडळकर आता आमदार झाले आहेत. त्यांनी विधिमंडळात प्रश्न मांडावेत आणि त्याची सोडवणूक करून घ्यावी .त्यांनी परवा भावनेच्या भरात जे विधान केले. त्यामुळे ते मांडत असलेल्या प्रश्नांची तीव्रता कमी झाली. शरद पवार यांना सर्वच राजकीय पक्षाचे नेते दैवत मानून काम करतात. त्यांच्यासारख्या वंदनीय माणसावर या भाषेत टिका करणे योग्य नाही."असे ढोबळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com