शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : शरद पवार - sharad Pawar target Modi government over agiculture act | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

कृषी कायद्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबई : "कुठलीही चर्चा न करता कृषी कायदा घाई घाईने मंजूर करण्यात आला आहे. अन्यदात्याच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. कृषी कायद्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

शरद पवार म्हणाले, "केंद्रीय कृषी कायदा पाठीमागं घ्यावा लागेल, त्यातून तोडगा निघेल. कृषी कायदा लोकसभेत मंजूर करण्याची घाई केली, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याचे लोन देशात सगळीकडे पसरेल का अशी भिती वाटते." आपण यूपीए अध्यक्ष होणार का या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की या बातम्या खोट्या आहेत. त्यात तथ्य नाही."

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंच्या या विधानाबाबत शरद पवार म्हणाले, " दानवेंसारखी माणसे काय बोलतात, त्यांना किती महत्व द्यायचे ? 

शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करत आता रेल्वे मार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. कायद्यांतील सर्व आक्षेपांच्या मुद्दय़ांवर चर्चेस सरकार तयार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री तोमर यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या सर्व आक्षेपांबाबत स्पष्टीकरण देण्यास तयार असल्याचे सांगत कृषी कायदे मागे घेणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे तोमर यांनी सांगितले.  

तोमर म्हणाले की कोरोना आणि थंडीच्या दिवसांमध्ये शेतकरी करत असलेल्या आंदोलनाची सरकारला काळजी आहे. शेतकरी संघटनांनी सरकारच्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सामंजस्याने पुढील चर्चा करता येईल. शेतकऱ्यांचे आक्षेप, शंका दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, ते कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून आहेत
 
हेही वाचा : युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दानवेंच्या घरावर धडकले  

भोकरदन : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानाचा हात असल्याचे धक्कादायक विधान दोन दिवसांपुर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. देशभरातून या वक्तव्याचा निषेध होत असतांना आज युवक काँग्रेसच्या वतीने भोकरदन येथील दानवे यांच्या निवासस्थानासमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दानवे व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख