शरद पवार यांनी शेअर केली 'एका बाबांची गोष्ट...'

शरद पवार यांनी बाबा आढाव यांचे जीवनपट मांडणारे शब्दचित्र त्यांच्या फेसबुकवरून प्रसिध्द केले आहे.
42Baba_Adhav_Final_0
42Baba_Adhav_Final_0

पुणे :  "हमालांच्या कल्याणासाठी हिमालायाइतके कष्ट उपसणाऱ्या हिंमतवाल्या बाबा आढावांना निरोगी दीर्घायू मिळावे," अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्या आहेत. आज कष्टकरी जनतेचे नेते, थोर परिवर्तनवादी विचारवंत डॉ. बाबा आढाव यांचा 91 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांनी बाबा आढाव यांचे जीवनपट मांडणारे शब्दचित्र त्यांच्या फेसबुकवरून प्रसिध्द केले आहे. त्यात पवार यांनी बाबांच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकला आहे.


"चांगली माणसे दीर्घायू असली पाहिजेत आणि बाबांना ते वरदान मिळाले आहे. बाबांनी कष्टकऱ्यांच्या कल्याणाचा वसा घेतला आणि ती एक प्रदीर्घ साधना असल्याने बाबांचे ध्यासपर्व शंभरीपार पोचेल यात शंका नाही," असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पवार यांनी, "बाबांवर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आजोळी घडले. भारत एकीकडे राजकीय स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत होता त्याचवेळी सामाजिक स्वातंत्र्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून साने गुरूजींनी देखील अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाचा लढा सुरू केला. बाबांचे वय १५-१६ वर्षाचे असेल, त्यांनीही पंढरीच्या विठ्ठलाचे द्वार सर्वांसाठी खुले करण्यासाठी गुरूजींच्या बरोबरीने उडी घेतली.

यंदा नव्वदीबरोबरच त्यांच्या सामाजिक चळवळीतील कार्याची पंचाहत्तरी पूर्ण होत आहे. बाबांचा हा अथक प्रवास थक्क करणारा आहे! अगदी लहान वयात त्यांनी सामाजिक लढ्यात स्वत:ला झोकून दिले. ‘झोकून दिले’ हा वाक्प्रचार त्यांनी पुढे प्रत्यक्ष कृतीतही आणला. पानशेत धरणाच्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर असताना ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्या दिवशी यशवंतराव चव्हाणांच्या गाडीचा ताफा त्याच रस्त्यावरून जात असताना पायलट गाडी पुढे सरकताच बाबांनी गाडीसमोर अंग टाकले.

ब्रेक दाबले गेले म्हणून बरे नाहीतर ‘झोकून देणे’ त्यांच्या जीवावर बेतले असते!" असा बाबांच्या आयुष्यातील एक प्रसंग पवार यांनी सांगून पवार यांनी," ह्या अचंबित करणाऱ्या अविश्रांत प्रवासात बाबा कधी नाउमेद झाले, कधी सुटीवर गेल्याचे ऐकिवात नाही. मला वाटते हवाबदल करण्यासाठी त्यांचे आवडते ठिकाण तुरूंग असावे.  बाबांनी वयाच्या २२ व्या वर्षी अन्नधान्याची दरवाढ करून गरीबांची परवड करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करून तुरुंगवास भोगला. बावन्न सालापासून त्यांनी तब्बल त्रेपन्न वेळा सामान्यांना न्याय देण्यासाठी कारावास पत्करला. यातून बाबा आढावांमध्ये एक चिवट आणि निडर चळवळ्या असल्याचे दर्शन घडते."

माणसाच्या आयुष्यात अन्न-पाणी, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा पुरवल्या गेल्या की तो किमान माणसाप्रमाणे जगतो. नाहीतर त्याची अवस्था प्राण्यांहून दयनीय असते. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यांना संघर्ष करावा लागे त्या कष्टकरी, अंगमेहनत करणाऱ्या उपेक्षित आणि असंघटीत वर्गासाठी बाबांनी आयुष्यभर संघर्ष केला. तुरूंगवासाची भीती मनात बाळगली नाही.

बाबा सुरवातीला हडपसर भागात वैद्यकीय व्यवसाय सांभाळत. पण रुग्णसेवा करत असताना मनातील अस्वस्थता त्यांना सामाजिक विकारांवर उपचार करण्यासाठी खेचत असे. काही वर्षे व्यवसाय सांभाळल्यानंतर ते पूर्णकाळ सामाजिक आंदोलनात समरस झाले. झोपडपट्टीत राहणाऱ्या, गरीबीने गांजलेल्या आणि कष्टाने पिचलेल्या वर्गासाठी त्यांनी झोपडपट्टी महासंघ स्थापन केला.

सक्रिय राजकारणात

अशा वंचितांना न्याय देण्यासाठी सक्रिय राजकारणात उतरून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. परंतु झोपडपट्टीसाठी बजेट नाही म्हणून  नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा पूर्णवेळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवण्यात आपण उणे पडत असल्याची खंत बाबांना जाणवते. खरं आहे कारण प्रत्येक आंदोलनाचा आणि चळवळीचा मूळ उद्देश बाजूला पडून त्याचे राजकारण होत आहे. बाबांनी राजकारणातून स्वत:ला बाहेर काढून सामाजिक उणीव भरून काढण्याचे मोठे कार्य केले.

‘एक गाव एक पाणवठा’

१९७१-७२ महात्मा फुले समता प्रतिष्ठान स्थापन करून , ‘एक गाव एक पाणवठा’ अभियान सुरू करून त्यांनी समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली; आणीबाणी काळात तुरूंगात असताना संघ विचारसरणीच्या दांभिकतेवरही प्रहार केला. मी राज्याचा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनात ते अग्रभागी होते. नामांतरासाठी पुणे ते औरंगाबाद असा लाँगमार्च देखील त्यांनी काढला.

१९२७ मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तरी जयपूर येथील न्यायालयासमोर मनुचा पुतळा कित्येक वर्षे तसाच राहिला होता. बाबांनी तो हटवण्यासाठी देखील लाँगमार्च काढला. पुरोगामी महाराष्ट्राच्या ह्या सुपुत्राची इतिहासात अक्षय्य नोंद राहील.  बाबांनी २०१२ मध्ये नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर असंघटित कामगारांसाठी पेन्शन परिषद घेतली. त्यापूर्वीही त्यांनी असंघटित कामगारांसाठी दिल्लीची दारे ठोठावलीत. त्यांच्या प्रयत्नाने ४५ कोटी असंघटित कामगारांच्या भल्यासाठी सामाजिक सुरक्षा कायदा विधेयक संसदेत मंजूर झाले असले तरी अंमलबजावणी होत नाही याची त्यांना खंत आहे.

‘कष्टाची भाकर’ मिळवून देण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या बाबांच्या कष्टाचे हा कायदा अंमलात आल्याने चीज होईल. मध्यवर्ती शासनाने त्याकडे लक्ष पुरवावे याकडे देखील या निमित्ताने लक्ष वेधतो. हमालांच्या कल्याणासाठी हिमालायाइतके कष्ट उपसणाऱ्या हिम्मतवाल्या बाबा आढावांना निरोगी दीर्घायू मिळावे म्हणून वाढदिवसानिमित्त माझ्या मनपूर्वक शुभेच्छा!" असे शरद पवार यांनी म्हटले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com