भूमिपुत्रांना गावाकडे पाठवा ; 'या' आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Send workers to the village, Sadabhau Khot's letter to the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

भूमिपुत्रांना गावाकडे पाठवा ; 'या' आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संपत मोरे : सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

सरकारने राज्यातील भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना तातडीने गावी पाठवण्याची व्यवस्था सरकारने करावी.

पुणे : "शहरात अडकलेल्या भूमिपुत्रांना गावाकडे पाठविण्याची सोय करावी," अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.
 
"पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह राज्याच्या विविध भागातील कष्टकरी  गेले दोन महिने मुंबई व विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत. प्रसारमाध्यमांतून टाहो फोडून आपल्याला गावी जायच आहे, अशी हाक मारत आहेत. पण जगभरातील आणि देशभरातील लोकांची आणण्याची सोय करताना महाराष्ट्र सरकारने आपल्याच राज्यातील भूमिपुत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना तातडीने गावी पाठवण्याची व्यवस्था सरकारने करावी. येत्या आठवड्याभरात सरकारने या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईसह राज्यभर रयत क्रांती संघटनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल," असा इशारा आमदार खोत यांनी दिला आहे.

"शेती परवडत नाही म्हणून शेतकरी कुटुंबातील मुले पुणे, मुंबई व विविध शहरांमध्ये आली. आपल्या कष्टाने त्यांनी शहराच्या आणि राज्याच्या प्रगतीत हातभार लावला. कोरोनामुळे आज ते शहरात अडकले आहेत. खरेतर लॅाकडाउन झाल्यानंतर सरकारने तातडीने त्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था करायला हवी होती. निदान त्यांना त्याचवेळी परवानगी द्यायला हवी होती. ती न दिल्यामुळे हजारो कष्टकरी मुंबई व विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत.

राज्यातील भूमिपुत्राकडे सकराने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. यामुळे एकप्रकारचे भय तयार होऊन लोक चोरट्या मार्गाने रातोरात खेड्यात दाखल होत आहेत. त्यांच्यात काही कोरोना पॅाझिटिव्हपण आहेत. त्यामुळे गावात सरसकट स्थलांतराविषयी संशयाची भावना तयार झाल्याने काही ठिकाणी संघर्षाची परिस्थिती तयार झाली आहे. यातील अतिशय दु:खाची आणि संतापाची बाब म्हणजे सरकारमधील एक मंत्रीच कोल्हापूर जिल्ह्यात या स्थलांतरीत भूमिपुत्रांना पाठवू नका, अशी मागणी करीत आहे. ही मागणी अमानवी आणि घटनाविरोधी आहे," असे खोत यांनी म्हटले आहे.

 

जीव मुठीत घेऊन कोंडून ठेवायचे काय ?

"आपल्या गावात यायच नाही तर या भूमिपुत्रांनी जायचं कोठे ? जीव मुठीत घेऊन मुंबईत स्वतःला कोंडून ठेवायचे काय ? याचा अर्थ मुंबईत राहणे एखाद्या छळछावणीत राहण्यासारखे झाले आहे. यामुळे अगतिक होवून चोरून स्थलांतर होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कुटुंबे स्वखर्चाने गावाबाहेर झोपड्या घालून राहत आहेत. त्यांचे म्हणणे आम्ही गावाबाहेर राहतो. पण सरकारने आमच्या महिलांना आंघोळीला आणि शौचालयांची तरी व्यवस्था करावी. या साऱ्या मुंबईत राहणाऱ्या मध्यमवर्गातील स्रिया आहेत. यांच्यावर काय संकट कोसळले असावे, याची मुख्यमंत्र्यांनी कल्पना करावी. तशात पावसाळा तोंडावर आहे. सरकारने युध्द पातळीवर प्रयत्न करून सुनियोजितपणे या भूमिपुत्रांची राहण्याची, अन्नाची व्यवस्था करायला हवी. पण दुर्दैवाने सरकार काही हालचाल करायला तयार नाही." अशी खंत खोत यांनी व्यक्त केली आहे. 

 

सरकारने या आठवड्याभरात या भूमिपुत्रांची गावी पाठवण्याची मागणी पूर्ण करावी, अन्यथा मुंबईसह राज्यभरात आंदोलन उभे केले जाईल व याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील. 
सदाभाऊ खोत, आमदार  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख