दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम, सतीश चव्हाणांची हॅट्रीककडे वाटचाल

भाजपचे शिरीष बोराळकर यांना मात्र पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांची बंडखोरी,आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे प्रा. सचिन ढवळे आणि बीडमधील अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी घेतलेल्या हजारोंच्या मतांचा चांगला फटका बसला आहे. बोराळकर हे दुसऱ्या क्रमांकावर असले तरी सतीश चव्हाण यांच्या मताधिक्यांपेक्षा देखील कमी मते त्यांच्या वाट्याला आली आहेत.
Marathwada Graduate Elections counting news Aurangabad
Marathwada Graduate Elections counting news Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांची आघाडी दुसऱ्या फेरीत देखील कायम आहे. दुसऱ्या फेरीत चव्हाण यांना  २६६२७ तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना १३८८९ मते मिळाली आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी दुसऱ्या फेरीत बोराळकरांवर १२३३८ मतांची आघाडी घेतली आहे. दोन्ही फेऱ्यांची मिळून सतीश चव्हाण यांनी ३००३६ मतांची आघाडी घेत हॅट्रीकच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. बाद मतांचे प्रमाण दुसऱ्या फेरीत देखील कायम असून ५२६० मते बाद झाली आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण १०६४१ मते अवैध ठरली आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात वाढलेला मतांचा विक्रमी टक्का सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडल्याचे दुसऱ्या फेरीतील मतमाेजणीतून देखील स्पष्ट झालेआहे. गेल्या निवडणुकीतील ३८ टक्यांवरून यावेळी मतांचे प्रमाण थेट ६४.५३ टक्यांवर पोहचल्याने ही बदलाची नांदी असल्याचा दावा भाजपचे बोराळकर यांच्याकडून करण्यात आला होता. तर महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी वाढलेले मतदान हे मी बारा वर्षात केलेल्या कामाची पावती असल्याचे सांगत हॅट्रीकचा दावा केला होता. तो खरा ठरतांना दिसतो आहे.

भाजपचे शिरीष बोराळकर यांना मात्र पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळे यांची बंडखोरी, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे प्रा. सचिन ढवळे आणि बीडमधील अपक्ष उमेदवार सिध्देश्वर मुंडे यांनी घेतलेल्या हजारोंच्या मतांचा चांगला फटका बसला आहे. बोराळकर हे दुसऱ्या क्रमांकावर असले तरी सतीश चव्हाण यांच्या मताधिक्यांपेक्षा देखील कमी मते त्यांच्या वाट्याला आली आहेत. आतापर्यंत दुसऱ्या फेरीचीच मतमोजणी झाली असली तरी चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाहता ते तिसऱ्यांदा  विजय मिळवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, सतीश चव्हाण यांची वाढती आघाडी पाहता मतमोजणी केंद्रातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले आहे. बोराळकर यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. ती मतपेटीतून व्यक्त होतांना दिसते आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा पदवीधर तसेच नागपूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो की काय? अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.

अवैध मतांची परंपरा कायम..

पदवीधरांचे मतदान म्हणजे सुशिक्षितांचे मतदान म्हणून या निवडणूकीकडे बघितले जाते. परंतु दोन फेऱ्यांमध्ये मिळून बाद झालेल्या मतांची संख्या पाहिली असता गेल्या निवडणुकीतील बाद मतांची परंपरा यावेळी देखील कायम असल्याचे दिसून आले आहे. दोन फेऱ्यात मिळून तब्बल १०६४१ एवढी मते बाद झाली आहेत. २०१४ च्या निवडणुकीत बाद मतांचे एकूण प्रमाण १२ हजार एवढे होते. यावेळी तो विक्रम देखील मोडला जाण्याची शक्यता आहे.

प्रमुख उमेदवारांची दुसऱ्या फेरीतील व एकूण मते

सतीश चव्हाण - महाविकास आघाडी - २६६२७ - ५४४७७

शिरीष बोराळकर- भाजप - १३९८९ - २५५४७

प्रा. सचिन ढवळे - प्रहार संघटना- २७१६ - ५१९४

प्रा. नागोराव पांचाळ - वंचित आघाडी - २२१३ - ४१४७

रमेश पोकळे - अपक्ष - १५१४ - ५०१४

सिद्धेश्वर मुंडे- अपक्ष - १७९७ - ४३२२

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com