औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत!

बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता.
sr17.jpg
sr17.jpg

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसमोर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या भूमिकेवर शिवसेनेने सामनामधून टीकेचे बाण सोडले आहेत. रोखठोक या सदरातून खासदार संजय राऊत यांनी बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? असा सवाल उपस्थित करून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. 

हिंदुस्थानची घटना 'सेक्युलर' आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात?

औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले.त्यामुळे सच्च्या मर्‍हाटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही, असे रोखठोक मध्ये म्हटलं आहे. 

औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार असताना त्याने बागलाण जिंकले. शहाजी भोसल्यांचा पराभव केला. मोगलांविरुद्ध बंड करणाऱया खेलोजी भोसल्यास ठार केले. शहाजहान हा औरंगजेबाचा बाप. बापाने त्याला 1657 साली दक्षिणेत पाठवले. विजापूर, गोवळकोंड राज्यांवर स्वाऱया करून औरंगजेबाने हाहाकार माजवला. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने 'औरंगाबाद' शहर वसविले. औरंगजेब क्रूर आणि धूर्त होता. बादशाही मिळवण्यासाठी त्याने आजारी बापाला कैद केले. सख्ख्या भावांचा खून केला. औरंगजेब हा एक कर्मठ सुन्नी मुसलमान होता. तो परधर्मद्वेष्टा होताच, पण हिंदूंचा कडवट दुश्मन होता. अनेक तऱहेचे कर लावून त्याने हिंदूंचा भयंकर छळ केला. 1669 मध्ये त्याच्याच हुकमाने मथुरेतील केशवदेवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. मंदिर पाडून मशिदी बांधण्याचा त्याला छंदच जडला होता. त्याच्या हिंदूविरोधी आक्रमणामुळे हिंदू सैरभैर झाले व जाटांनी बंडे केली. औरंगजेबाने ती निर्घृणपणे मोडून काढली. छत्रसाल बुंदेला व सतनामी यांनी औरंगजेबाच्या हिंदूविरोधी धोरणाविरुद्ध उठाव केला, पण सामर्थ्याच्या जोरावर औरंगजेबाने तो मोडून काढला. शिखांचे गुरू तेगबहादूर यांनीही औरंगजेबाच्या धोरणास विरोध केला.
 
काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये...
मराठवाडय़ातील सरकारी कागदोपत्री 'औरंगाबाद' नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे 'सेक्युलर' पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच. 

आक्रमक मोगल

औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला. त्या प्रसंगाचे वर्णन असे करण्यात आले आहे. 

औरंगजेब मर्‍हाटा, शीख, जाट, रजपूत सगळय़ांचा द्वेष करीत होता. त्याचे संबंध इराण, बुखारा, मक्का, बाल्ख या प्रांतांतील मुसलमान राजांशी होते. त्याला सर्व हिंदू राजांना खतम करून धर्माच्या आधारावर स्वतःची बादशाही निर्माण करायची होती, पण छत्रपती शिवाजीराजांसारखे मोजके योद्धे औरंगजेबाला स्वस्थता लाभू देत नव्हते.

इतिहास पुन्हा वाचा

महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱयांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. 1679 मध्ये त्याने जिझिया व इतर अनेक कर हिंदूंवर लादले. हिदूंचे उत्सव, धार्मिक क्रतवैकल्ये, पूजाअर्चा यावर निर्बंध आणले. औरंगजेब धर्मांध होता. त्याला हिंदुस्थानात फक्त इस्लाम धर्मच ठेवायचा होता. इस्लामचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्याने खास यंत्रणा उभी केलीच, पण धर्मांतरावर भर दिला. धर्मांधतेपायी त्याने हिंदूंची देवालये, शाळा, धार्मिक व्यवहार, शिकवण मोडून काढण्याचे अधिकार आपल्या अधिकाऱयांना दिले. पूजाअर्चा सांगणारा ब्राह्मण वर्ग त्यामुळे दहशतीखाली जगू लागला. 

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं 'सेक्युलर' नव्हे!

औरंगजेबाच्या जीवनात कपट
मथुरा येथील केशवदेवाचे मंदिर, वाराणसीचे विश्वनाथाचे व बिंदुमाधवाचे मंदिर, गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर त्याने उद्ध्वस्त केले. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com