राऊतांचे विधान अर्धवट माहितीच्या आधारे.. दरेकरांचा टोला - Sanjay Raut statements are based on partial information Pravin Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

राऊतांचे विधान अर्धवट माहितीच्या आधारे.. दरेकरांचा टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जानेवारी 2021

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर  टिका केली आहे. 

मुंबई : ''सध्या राज्याचे राजकारण औरंगाबादच्या नामांतरावरुन पेटले आहे. भाजप नामांतराच्या मुद्यावर आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांचे विधान अर्धवट माहितीच्या आधारे असते,'' अशा शब्दामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करुन टिका केली. 

देशातील इतर शहरांचे नामांतरण केले तेव्हाच, औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर का केले नाही, असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला होता. त्यावरुन दरेकर यांनी राऊतांवर निशाना साधला.

आपल्या टि्वटमध्ये दरेकर म्हणाले की कुठल्याही शहराचं नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया असते. औरंगाबादच नामकरण संभाजीनगर करायच असेल, तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्य मंत्रिमंडळाकडे निर्णय द्या, नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीसरकारवर टिका केली. 

औरंगाबादच्या नामांतरावरुन माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, यांचा (राज्य सरकारचा) एकही विषय, एकही दिवस, एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचं, मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? महाकाली लेणी संदर्भात निर्णय घेताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का? आमच्या अस्मितेसंदर्भात कुठलाही विषय केंद्राकडे अडकणार नाही. आम्ही त्याच्या पाठीशी असू. परंतू, नाचता येईना अंगण वाकडं अशी राज्य सरकारची गत झाली आहे. 

आता त्यांना सत्ता जास्त महत्वाची वाटते. काँग्रेसने नामांतराच्या मुद्यावर दरेकर म्हणाले, ''शिवसेनेने बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर आता प्रतिक्रिया द्यावी. काही झालं तरी चालेल, प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर नामकरकण करू असं म्हणत होते, आता आहे का हिंमत? आता त्यांना सत्ता जास्त महत्वाची आहे.त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं फारकाळ लक्ष विचलीत करता येणार नाही. 

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले होते....

आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॅा. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामकरण केले, त्याचवेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करुन तुम्ही का मोकळे झाला नाहीत, ते जरा जनतेला सांगून टाका. महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजीराजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत, असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला होता.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख