संजय राऊतांना बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाकडून आठवडाभराचा अवधी.. - Sanjay Raut has a week to present his case in the High Court. | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊतांना बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाकडून आठवडाभराचा अवधी..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

संजय राऊत आणि मुंबई महापालिकेला या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आठवडाभराचा अवधी न्यायालयाने दिला आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदा बांधकामासंबंधित याचिकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. राऊत यांनी दिलेल्या कथित इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई केली, असा दावा कंगनाने केला आहे. यामुळे कंगना विरुद्ध राऊत सामना आता न्यायालयात रंगणार आहे. उद्यापासून कंगनाचे वकील याबाबत बाजू मांडणार आहेत. 

कंगना राणावतच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदा बांधकाम मुंबई महापालिकेनं पाडले, याबाबत उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेवर ताशेऱ ओढले आहे. संजय राऊत आणि मुंबई महापालिकेला या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आठवडाभराचा अवधी न्यायालयाने दिला आहे. 

न्यायालयाच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना मराठी अभिमानासाठी आणि महाराष्ट्र बाण्यासाठी मी अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळे या केसमुळे त्यापासून तसूभरही ढळणार नसल्याचे म्हटले आहे.

न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. कंगनाच्या वतीने ऍड. बीरेंद्र सराफ यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राऊत यांची एक डीव्हीडी न्यायालयात दाखल केली. यामध्ये कंगनाच्या "पीओके' संबंधित विधानाबाबत टिप्पणी करण्यात आली आहे. तिला (उखाड दिया) इशारा दिला आहे, असे सराफ यांनी सांगितले.

जर डीव्हीडीवरून आरोप करायचे असतील, तर त्यासाठी संबंधित व्यक्तीचीही बाजू ऐकणे आवश्‍यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तसेच एच प्रभागाचे महापालिका अधिकारी भगवान लाटे यांच्यावरही कंगनाने व्यक्तिशः आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रतिवादी करण्याची परवानगी खंडपीठाने दिली.

कंगनासह अन्य काहीजणांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासह अन्य काही जणांचा समावेश आहे. या व्यक्तींना किती दिवसाची मुदत दिली होती आणि त्यांच्यावर काय कारवाई केली, असे न्यायालयाने महापालिकेला विचारले आहे. कंगनाने नवीन मुद्दे याचिकेत नमूद केले आहेत.  कंगनाने याचिकेत म्हटले आहे, की बंगल्यात काही वर्षांपूर्वी बदल केले होते; मात्र आता म्हणते की बदलच केले नाहीत. यामुळे तिच्या विधानात विसंगती आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
 
"कंगनाची पण चैाकशी व्हायला पाहिजे.."
 
पुणे : "कायदा सर्वासाठी समान आहे. सगळ्याना बाबत जो न्याय आहे. तशाच न्याय अभिनेत्री कंगना राणावत विषयी पाहिजे. ड्रग्ज घेतल्याची कबुली कंगनाने दिली आहे. त्यामुळे तिचीही चैाकशी व्हायला पाहिजे," असं मत विरोधीपक्षनेते भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॅालीवुडमधील अनेक कलाकारांशी चैाकशी होत आहे. कंगना राणावतने जर ती ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली असेल आणि याबाबत पुरावे असेल तर तिची चैाकशी एनसीबीने केली पाहिजे, असे दरेकर यांनी सांगितलं. बॅालीवुडमधील अनेक कलाकारांचा ड्रग्जशी संबध असल्याचा आरोप सध्या होत आहे. अनेक कलाकारांचे नाव समोर येत आहे. तर काहींना एनसीबीनं त्यांना चैाकशीसाठी नोटिस पाठविली आहे. राज्यातील महत्वाच्या मुद्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकार या ड्रग्ज प्रकरणाकडं सगळ्याचं लक्ष वळवित असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. 

Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख