आमदारांच्या शिष्टाईमुळे ज्येष्ठांना मॉर्निंग वॉकसाठी उद्यान खुले

"मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुरुवारपासून ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने आज घेतला.
 आमदारांच्या शिष्टाईमुळे ज्येष्ठांना मॉर्निंग वॉकसाठी उद्यान खुले
सुर्वे4.jpg

मुंबई : "मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुरुवारपासून (ता. 4) ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने आज घेतला. अन्य नागरिकांसाठीही उद्यान लवकरच खुले केले जाईल," असे आश्वासनही आमदार प्रकाश सुर्वे यांना उद्यान प्रशासनाला दिले आहे.   

कोरोनाच्या फैलावामुळे एप्रिलपासूनच उद्यान बंद करण्यात आले. यात पर्यटकांना टायगर सफारी, कान्हेरी गुंफा, मिनीट्रेन येथेही प्रवेश बंद करण्यात आला. सकाळी व संध्याकाळी वॉक तसेच जॉगिंगला येणाऱ्यांनाही प्रवेश बंद झाला. मात्र लॉकडाउन उठल्यानंतर हळुहळू व्यायाम, मॉर्निंगवॉक व अन्य बाबींना परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे उद्यानही सर्वांनाच खुले करावी, अशी मागणी वारंवार होत होती. स्थानिक खासदारांनीही अनेकदा ही मागणी केली होती.

या बंदीचा सर्वात जास्त फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. हक्काचे व्यायामाचे ठिकाण बंद असल्याने त्यांना इतर गर्दीच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर वाहनांच्या धडकेचा धोका पत्करून मॉर्निंग वॉक करावा लागत होता. नेहमीच्या प्रदूषित रस्त्यांवर व्यायाम करण्यात फारसा अर्थ नसल्याचेही ज्येष्ठांना जाणवत होते. दहीसर ते कांदिवली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांनी ही बाब मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निदर्शनास आणली. त्यानुसार सुर्वे यांनी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर उद्यान प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्यवन संरक्षक सुनिल लिमये आणि मुख्यवनसंरक्षक मल्लिकार्जुन यांच्याबरोबर ही बैठक झाली. उद्यान अद्यापही बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाची कल्पना सुर्वे यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. फक्त ज्येष्ठांसाठी तरी सकाळी मॉर्निंग वॉकसाठीचा भाग खुला करण्याची मागणी त्यांनी केली होती. 

यावेळी आरोग्य विषयक तसेच सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील याची हमीही त्यांनी आणि ज्येष्ठांच्या संघटनांनी दिली. ज्येष्ठांना सकाळी उद्यानात व्यायाम करता आला तरच त्यांचे आरोग्य व रोगप्रतिकारशक्ती चांगली राहून ते कोरोनाला पराभूत करू शकतील, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार ज्येष्ठांच्या मॉर्निंग वॉकसाठी गुरुवारपासून उद्यान खुले करण्यास अधिकाऱ्यांनी संमती दिली. हा अनुभव पाहून व काही दिवसांनी एकंदरित सर्व आढावा घेऊन अन्य नागरिकांसाठीही उद्यान खुले करण्याबाबत विचार केला जाईल, अशी हमीदेखील अधिकाऱ्यांनी सुर्वे यांना दिली. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in