#MarathaReservation संभाजी राजेंचे खासदांराना पत्र ; पंतप्रधानांना भेटून प्रश्न मार्गी लावा..  - Sambhaji Rajes letter to MP ; The issue should be resolved by meeting the Prime Minister | Politics Marathi News - Sarkarnama

#MarathaReservation संभाजी राजेंचे खासदांराना पत्र ; पंतप्रधानांना भेटून प्रश्न मार्गी लावा.. 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

मराठा आरक्षणाबाबत खासदारांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावाला, असं पत्र  छत्रपती संभाजी राजे यांनी खासदारांना पाठविलं आहे.

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावाला, असं पत्र खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सर्व पक्षीय खासदारांना पाठविलं आहे. सर्व खासदारांनी एकजुटीनं हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, असं संभाजी राजे यांनी पत्रात म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी राजे यांनी लिहिलेल्या पत्रात ते खासदारांना म्हणतात की आपण सर्व जण मराठा आरक्षण प्रश्नांविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधान सभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरीता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे. 

हे करत असताना न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती मध्ये स्थगिती दिली आहे. "दुसऱ्या राज्यातील 50% पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशा प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे. 

केंद्राने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला  10% आरक्षण दिले आहे. ते देखील न्यायालयात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली  नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे," असे संभाजी राजे यांनी नमूद केलं आहे.

"माझी सर्वांना एक विनंती राहील की आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33% च्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. 

या पार्श्वभूमीवर माझी सर्वांना विनंती राहील की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू," असे संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.  

कोरोना काळात आंदोलने नको; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार या समाजाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व ते प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात आंदोलने करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "हा विषय अशा पद्धतीने येण्याची आवश्यकता नव्हती. गेल्या वेळी विधीमंडळातल्या सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. त्यावेळी आम्ही भाजपबरोबर सत्तेत होतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होते. आज चित्र बदलले असले तरी सर्व पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकाच मताचे आहेत,'' 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख