sachin sawant questions devendra fadavnis on baldeo singh issue | Sarkarnama

बलदेव सिंह यांच्या विरोधातील चौकशी अद्याप अपूर्ण का? फडणविसांनी उत्तर द्यावे!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल काँग्रेसने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अश्विनीकुमार यांनी कारवाई केली होती. यामुळेच आचारसंहिता लागू असतानाही तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने फडणवीस सरकारचा प्रस्ताव नाकारला. तरीही विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा नविन प्रस्ताव पाठवून त्यांची बदली केली. यातूनच तत्कालीन फडणवीस सरकारचा हेतू शुद्ध नव्हता हे स्पष्ट होते, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. त्यातही लातूर आणि वर्धा येथील प्रचाराच्या भाषणांमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या नावाने त्यांनी मते मागितली होती. सदर प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याने तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी त्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला होता. त्याचबरोबर भाजपाकडून टीव्ही मालिकांच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला होता, त्याविरोधात काँग्रेसने तक्रार केली होती.  

सावंत यांनी शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या नेमणुकीची प्रक्रिया संशयास्पद आहे, असा आरोप करून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. यासंदर्भात आज त्यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागातील दक्षता विभागाने माहिती अधिकारात दिलेले उत्तर जाहीर केले. ऑक्टोबर २०१९ मध्ये दिलेल्या या उत्तरात सध्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह हे सिप्झ येथे विकास आयुक्त असताना त्यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने ११ मे २०१८ रोजी दिलेल्या चौकशीच्या आदेशान्वये सुरु असलेली चौकशी ही वाणिज्य मंत्रालयाच्या दक्षता विभागाकडून सुरु असून ती अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचवली जाईल असे म्हटले आहे. या पत्राद्वारे हे स्पष्ट होते की, फडणवीस सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली तेव्हा बलदेव सिंह यांच्याविरोधात चौकशी सुरु होती. फडणवीस सरकारला या चौकशीबाबत माहीत नव्हते का? बलदेव सिंह यांच्या कनिष्ठ अधिका-यांवर आरोप निश्चित होतात. परंतु दोन वर्ष उलटून गेली तरी बलदेवसिंह यांची चौकशी पुढे सरकत का नाही? या प्रश्नांची उत्तरे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी द्यावीत असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख