शरद पवारांच्या दैाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा.. - Relief to farmers due to Sharad Pawar visit | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या दैाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

पवार देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी मदतीचा हात दिला होता, यामुळे आताही ते अशाचप्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा अधिकृत दौरा जाहीर करण्यात आला आहे. 18 व 19 तारखेला जिल्ह्यातील तुळजापुर, उमरगा व परंडा तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे नियोजन आहे. 

पवार हे तुळजापुर येथेच मुक्कामी राहणार असुन दौऱ्यामध्ये तुळजापुरला अधिक वेळ दिल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जिल्ह्यामध्ये येत आहेत. शेतकरी या संकटामुळे पुरता कोसळला आहे. त्यावेळी पवार यांनी भेट देण्याचे नियोजन केल्याने शेतकरी वर्गालाही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

राष्ट्रवादी सध्या राज्याच्या सत्तेत अग्रभागी आहे, त्यातही पवार यांच्या शब्दाला या सरकारमध्ये सर्वाधिक किंमत असल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यांने निश्चितपणाने काही ना काही हाती लागल्याशिवाय राहणार, अशी भावना व्यक्त होत आहे. पवार देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी गारपीठीने शेतकरी उध्द्वस्त झाला होता, तेव्हाही पवार पहाटेच चिखल तुडवित नुकसान झालेल्या पिकाचे पाहणी करत होते. त्यांनी तिथूनच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोनवरुन परिस्थितीची माहिती दिली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना पवार यांनी मदतीचा हात दिला होता, यामुळे आताही ते अशाचप्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

पवार सकाळी रविवारी सव्वा नऊ वाजता तुळजापुर येथे येणार आहेत. तिथुन ते उमरगा तालुक्यातील तसेच तुळजापुर तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देणार आहेत. एक ते पावणेदोन एवढी वेळ राखुन ठेवली आहे. पावणे दोन ते साडेपाचपर्यंत ते औसा, उस्मानाबाद व तुळजापुर येथील गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर तुळजापुर येथील विश्रामगृहावर ते मुक्कामी राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत पुन्हा तुळजापुर तालुक्यातील उर्वरीत गावांना भेटुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पावणेबारा वाजता पत्रकाराशी संवाद साधुन तुळजापुर येथुन परंडयाकडे जाणार आहेत. साडेबारा वाजता परंडा तालुक्यातील गावांना भेटी देऊन दुपारी दोन ते अडीच हा काळ राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वाजता ते परंडा येथुन बारामतीला रवाना होणार आहेत. यामध्ये त्यानी तुळजापुर तालुक्याला अधिक वेळ दिल्याचे लक्षात येत आहे.

अतिवृष्टी भागातील शेतकर्‍यांना देवेंद्र फडणवीस भेटणार 

मुंबर्ई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ता. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. ता. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, ता. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी ता. 21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख