पुणे पदवीधर मतदारसंघामधून भाजपकडून मावळचे एकनिष्ठ की महापौर ?  - Ravindra Bhegade of Maval from Pune Graduate Constituency or Muralidhar Mohol of Pune | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधर मतदारसंघामधून भाजपकडून मावळचे एकनिष्ठ की महापौर ? 

उत्तम कुटे
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

भाजपने मराठा कार्ड पुणे पदवीधरसाठी खेळायचे ठरवले आहे. त्यामुळे मोहोळ यांचे पारडे जड झाले असून ते डार्क हॉर्स ठरू शकतात, असे भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष आणि जनसंघापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कुटुंबातील रविंद्र भेगडे यांच्यानंतर आता एक आणखी नाव समोर आले आहे. ते म्हणजे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ. यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीबरोबर शिवसेना आणि कॉंग्रेसही एकत्र असल्याने भाजपने मराठा कार्ड पुणे पदवीधरसाठी खेळायचे ठरवले आहे. त्यामुळे मोहोळ यांचे पारडे जड झाले असून ते डार्क हॉर्स ठरू शकतात, असे भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. त्यात चर्चा होऊन उमेदवार निश्चीत होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गतवेळी (२०१४) पुणे पदवीधरमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे चंद्रकांतदादा पाटील हे २,३८० असे निसटत्या मताधिक्याने विजयी झाले होते. राष्ट्रवादीतील बंडखोरी त्यांच्या पथ्यावर पडली होती. यावेळी, मात्र राष्ट्रवादीला शिवसेना व कॉंग्रेसची ताकद मिळणार आहे. 

दुसरीकडे आपल्या प्रदेशाध्यक्षांची ही जागा राखण्यासाठी भाजपने ती प्रतिष्ठेची केली आहे. म्हणून ती राखण्यासाठी तसेच या मतदारसंघात हॅटट्रिक नोंदविण्याकरिता त्यांनी मतदार नोंदणी मोहीम जोरात राबवली.त्यानंतर आता ही जागा कायम ठेवण्यासाठी मराठा उमेदवार देण्याची खेळी पक्ष करणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आज दिली. तसं झालं, तर या स्पर्धेत नाव घेतल्या जात असलेल्या ब्राम्हण उमेदवारांचा पत्ता आपोआप कट होणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार मराठा असण्याची शक्यता जवळपास नक्की झाल्याने ती गृहित धरून तशीच खेळी भाजपनेही खेळायचे ठरवले आहे.

दरम्यान, मतदारसंघातील दुसरे मराठा इच्छूक व त्यांच्या समर्थकांनी काल मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीसांना कालच डिस्चार्ज मिळाला आहे. ते क्वारंटाईन राहणार असल्याने त्यांची भेट या शिष्टमंडळाला मिळाली नाही. त्यामुळे त्यांना फोनवरच समाधान मानावे लागले. आपले उमेदवारीचे प्रयत्न सुरुच असून आपण आशावादी असल्याचे या उमेदवाराने आज सरकारनामाला सांगितले. त्यामुळे या दोन मराठा इच्छूकांपैकी कोणाची लॉटरी लागणार हे लवकरच कळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख