शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राजू शेट्टी २३ पासून काढणार पायी मोर्चा - Raju Shetty to Start Morcha From Twenty Third November | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राजू शेट्टी २३ पासून काढणार पायी मोर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली दि. २३ ते २५ या कालावधीत सातारा ते कराड असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.

सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली दि. २३ ते २५ या कालावधीत सातारा ते कराड असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाची समाप्ती दि. २५ रोजी कराड येथे होणार असून त्याबाबतचे निवेदन आज संघटनेच्या वतीने राजू शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, देवानंद पाटील, जनार्दन आवारे, संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार केंद्र आणि राज्य सरकारला निवेदने देण्यात आली आहेत. निवेदने देवूनही शासन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी दि. २३ ते २५ या कालावधीत हा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात दि. २३ रोजी सकाळी नउ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेत्तृत्वाखाली सातारा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन होणार आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देण्यात येणार आहे. 

पायी मोर्चाचा पहिला मुक्काम काशीळ येथे असणार असून दि. २४ रोजी सकाळी मोर्चा पुन्हा कराडकडे मार्गस्थ होईल. दि. २४ रोजी खोडशी येथे मोर्चा रात्रीचा मुक्काम करणार असुन यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. याठिकाणाहून सकाळी मोर्चा कराडकडे मार्गस्थ होईल.

दि. २५ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन दिल्यानंतर थोड्यावेळासाठी ना. पाटील यांच्या घरासमोर इशारा आंदोलन करण्यात येणार आहे. इशारा आंदोलन संपवून मोर्चा कराड येथील प्रितीसंगम येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होणार आहे. समाधीला अभिवादन, चिंतन सत्याग्रह करुन येथे मोर्चाची समाप्ती करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख