एकाकी पडलेले राजू शेट्टी म्हणतात, ``इसके बाद खेल भी मेरा और खिलाडी भी मेरे होंगे!``

राजू शेट्टींचे पुन्हा रणशिंग
raju shetty
raju shetty

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उत्तम लिहितात, त्यांचे वाचनही चांगले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, ऊर्दू भाषेतील चांगली पुस्तके ते वाचतात. काही राजकीय संदेश द्यायचा असेल तर ते शेरोशायरीचा आधार घेतात. या ओळींतून थेट असा अर्थ निघत नाही. पण जो तो आपापल्या परीने त्याचे अर्थ शोधतो. राऊतांची आणि त्यांच्या शेरची चर्चा होते. मग दिवसभर राऊत टिव्हिवर झळकतात. त्यावर विश्लेषक मते मांडतात. प्रत्यक्षात राजकीय स्थिती बदललेली असेलच असे नाही पण राऊतांचा उद्देश साध्य होतो. 

आशीर्वाद दिखाई नही देते ..... परंतु असंभव को संभव बना देते हैं !!!, असे वाक्य राऊत यांनी आजच ट्विट केले. त्याचे अर्थ शोधण्यात पत्रपंडित कामाला लागले. आता त्याच धर्तीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आपले विचार हिंदी ओळींतून मांडले आहेत. 

हारा नहीं हूं मैं बस खेल समझ रहा था !

इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरे होंगे !

अशा ओळी शेट्टी यांनी सोशल मिडियातून व्यक्त केल्या आहेत. आता याचे अनेक अर्थ निघू शकतात. पंढरपूर येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीशी फारकत घेत आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. उमेदवार सचिन शिंदे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शेट्टी यांनी आपले हे विचार व्यक्त केले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत 2019 ला पराभव झाल्यानंतर शेट्टी हे तसे एकाकी पडले आहेत. ना भाजपसोबत ना महाविकासआघाडीत. ना सत्तेसोबत ना विरोधात, अशी त्यांची अवस्था झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांची राज्यापाल कोट्यातून आमदार म्हणून शिफारस केली. मात्र ती नियुक्ती अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. मात्र महाविकास आघाडीच्या कोट्यातून आमदार होत असल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली. संघटनेत फूट पडण्याची वेळ आली होती. मात्र शेट्टींना आमदाराकी मिळाली नाही आणि फुकटचे टिकेचे धनी व्हायला लागले.

दुसरीकडे शेट्टी यांचा संघर्षही संपलेला नाही. उसाच्या भावावरून, ऊसबिलाच्या थकबाकीवरून त्यांचा संघर्ष हा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांशीच यंदा झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील या नेत्यांच्या कारखान्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. तेथूनच शेट्टी यांना आपले महाविकास आघाडीशी जमणार नसल्याचा साक्षात्कार झाला असावा. त्यामुळे त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला. स्वाभिमानीचे स्टार प्रचारक रविकांत तुपकर यांनी येथील प्रचारसभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता पुन्हा स्वतंत्र वाटचाल करण्याच्या मानसिकतेत तर नाही ना, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शेट्टी हे खेळ समजून घेत होते. यानंतर खेळही त्यांचा असणार आणि खेळाडूही त्यांचेच असणार, असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ते आता कोणाच्या दावणीला बांधले जाणार नाहीत, असेही म्हणता येऊ शकते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com