आरोग्यमंत्री राजेश टोपेंची सूचना.. जिल्हास्तरावर  ऑक्‍सिजन टॅंक स्थापन करा.. 

ऑक्‍सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
collage (24).jpg
collage (24).jpg

मुंबई : रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी राज्य सरकारमार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रीय ऑक्‍सिजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी सूचना दिल्या आहेत. 

कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्‍सिजन मिळावा; तसेच ऑक्‍सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या, तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी 50 ड्युरा सिलिंडर आणि 200 जम्बो सिलिंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याची ऑक्‍सिजनची गरज 400 मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता 1,081 मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्‍सिजनचे जम्बो सिलिंडर 17 हजार 753, बी टाईप सिलिंडर 1547, ड्युरा सिलिंडर 230, लिक्विड क्रायोजनिक ऑक्‍सिजन टॅंक 14 असून आणखी 16 ठिकाणी काम सुरू आहे. राज्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी सरासरी किती रुग्णांना ऑक्‍सिजन बेड लागतात, याचा विश्‍लेषणात्मक आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा आणि महापालिका कार्यक्षेत्रात त्यानुसार ऑक्‍सिजन बेड उपलब्ध असावेत, याकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्‍सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग, परिवहन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ऑक्‍सिजन पुरवठ्यामध्ये समन्वय साधण्यासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याच प्रकारे समितीचे गठन करण्यात आले आहे. राज्यस्तरावर आरोग्य सेवा आयुक्त यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग आणि परिवहन अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पावसाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाकडे ऑक्‍सिजन पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरू राहील. राज्यस्तरावरदेखील ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत असेच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक 022- 26592364 आणि टोल फ्री क्रमांक 1800222365 देखील जाहीर करण्यात आला आहे.

ऑक्‍सिजन टॅंक स्थापन करा
राज्यातील शंभर किंवा त्याहून अधिक खाटा असलेल्या सर्व सार्वजनिक रुग्णालयांनी जिल्हा नियोजन व विकास परिषद किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अथवा कार्पोरेट सामाजिक जबाबदारीमधून निधी प्राप्त करून क्रायोजनिक ऑक्‍सिजन टॅंक स्थापन करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णालयांना निधीची अडचण येईल, त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com