भाजपचाच शब्द खरा ठरला..अजितदादांच्या हस्ते सोडत निघालीच नाही... - The Prime Minister Housing Scheme in Pimpri Chinchwad was draw by Prakash Javadekar | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचाच शब्द खरा ठरला..अजितदादांच्या हस्ते सोडत निघालीच नाही...

उत्तम कुटे
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

ऑनलाईन सोडतीचाही पूरता फज्जा उडाला. जावडेकरांचे भाषण पाहणे सोडा, ऐकायलाही मिळाले नाही.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याऐवजी भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याच हस्ते आज ऑनलाईन काढण्यात आली.

अजितदादांच्याच हस्ते सोडत काढण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने आंदोलन करून ती गेल्या महिन्यात काढू न देता रद्द करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, या ऑनलाईन सोडतीचाही पूरता फज्जा उडाला. जावडेकरांचे भाषण पाहणे सोडा, ऐकायलाही मिळाले नाही. तर, उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे भाषण ऐकूच आले नाही. त्यावर त्यांचा आवाज कोणी म्यूट केला, अशी उपरोधीक प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली. तर, महापौरांनी भाषण वाचून दाखवले.

वाढत्या कोरोनामुळे ही सोडत ऑनलाईन काढण्याचा निर्णय पालिकेने घेऊन त्यासाठी गर्दी न करता ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, तांत्रिकदृष्ट्याच नाही, तर नियोजन आणि समन्वयाच्या पातळीवरही ही सोडत फेल गेली. त्यामुळे ती ट्रोल झाली.

तिखट प्रतिक्रिया व उपरोधिक मिम्सचा त्यावर पाऊस पडला. जमत नसेल, तर करता कशाला, आमचा दररोजचा दीड जीबी डाटा संपला, पण ना काही पहायला मिळाले ना ऐकायला, कॅमेरा सुद्धा सरळ धरता येत नाही, का अशा कमेंटस सोडतीवर आल्या. एकूणच ही सोडत आणि वाद हे समीकरण शेवटपर्यंत कायम राहिले. सोडतीचा पिच्छा वादाने शेवटपर्यंत सोडलाच नाही. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारा पालिकेचा संगणक विभाग, मात्र स्मार्ट नसल्याची चर्चा प्रत्यक्ष उपस्थितांत ऐकायला मिळाली.

३, ६६४ घरांची ही सोडत गेल्या महिन्यात ११ तारखेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते काढण्यात येणाऱ होती. पण, ती पालकमंत्री या नात्याने अजितदादांच्या हस्ते काढण्याची मागणी करीत राष्ट्रवादीने सोडतीच्या वेळी निर्दशने केल्याने ती राजशिष्टाचाराला धरून नसल्याचे सांगत प्रशासनाने शेवटच्या क्षणी ती रद्द केली होती. या योजनेचे फक्त वीस टक्के काम झाले असल्याने निव्वळ श्रेय घेण्यासाठी ती काढण्यास राष्ट्रवादीने विरोध केला होता. त्यामुळे ती आज अजितदादा व जावडेकर यांच्या हस्ते काढण्याचा निर्णय़ झाल्याने राष्ट्रवादीचा विरोध मावळला होता.  

जावडेकर ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनीच सोडत काढली. अजितदादाच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून कालच आला होता. नंतर ते ऑनलाईन येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐनवेळी त्यांचा संपर्क न झाल्याने ते ऑनलाईनही उपस्थित राहू शकले नाहीत, असे समजले. या योजनेकरीता आलेल्या ४७,८७८ अर्जांपैकी ४७,७०७ पात्र ठरले आहेत. त्यांच्यात ही सोडत काढण्यात आली. यावेळी महापौर माई ढोरे, आमदार लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सभागृह नेते नामदेव ढाके, आय़ुक्त राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सोडतीत नंबर लागलेल्या काहींची नावे महेशदादा आयुक्तांनी प्रातिनिधीक स्वरुपात वाचून दाखवली. नंतर, नंबर लागलेल्यांना कुठल्या इमारतीत, कितव्या मजल्यावर घर मिळाले आहे, याचाही ड्रॉ काढण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख