पैशाचे सोंग आणता येत नाही, याचे भान अजितदादांनी ठेवलं... 

अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे.एकंदर तरतुदी पाहता महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो.
4Sanjay_20Raut_20_20Ajit_20Pawar.jpg
4Sanjay_20Raut_20_20Ajit_20Pawar.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले आहे. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे. तर टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. 

अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे. त्यामुळे ते कितीही आगपाखड करत असले, तरी अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो. जनतेच्या खिशातून नव्याने काही काढण्याचा कुठेही प्रयत्न दिसत नाही. या अर्थाने हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा आहे. कोरोनामुळे अभूतपूर्व आव्हाने येऊनही रडगाणे न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही, याचे पुरेपूर भान ठेवत अर्थमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागांचा, विविध क्षेत्रांचा आणि घटकांचा साकल्याने विचार करून एक सर्वसमावेशक आणि समतोल म्हणावा असा अर्थसंकल्प सादर केला. एकीकडे सव्वा वर्षापासून घोंगावत असलेले कोरोनाचे वैश्विक संकट, लॉक डाऊनमुळे बाजारपेठा, व्यापार-उद्योग आणि एकूणच अर्थव्यवस्थेचा झालेला काेडमारा त्यातून राज्याच्या महसुलात झालेली घट व तिजोरीला बसलेला फटका आणि जीएसटी व केंद्रीय करांचा हजारो कोटींचा केंद्रीय सरकारकडे थकलेला परतावा अशा चौफेर संकटांचे आव्हान असताना अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते. मात्र, तारेवरची ही कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा विकासाला चालना देणारा जो दुसरा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहेत, असे कौतुक सामनामध्ये करण्यात आले आहे. 

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात...

अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो. जनतेच्या खिशातून नव्याने काही काढण्याचा कुठेही प्रयत्न दिसत नाही. या अर्थाने हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा आहे. महाराष्ट्राचा लौकिक उद्योगप्रधान राज्य असा असला, तर कोरोनाच्या संकटात शेती आणि कृषिपूरक उद्योगांनीच राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी दिली, असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले होतेच. 

उद्योग व इतर क्षेत्रांची आर्थिक वाढ उणे होत असताना महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राने मात्र प्रगतीचा 11.7 टक्के इतका विक्रमी वेग नोंदविला. त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटणे साहजिकच होते. कोरोनामध्ये राज्याला तारणाऱया शेती आणि शेतकऱयांसाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली ती यासाठीच. कोरोनामुळे अभूतपूर्व अशी आव्हाने येऊनही रडगाणे न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. विरोधक काही म्हणोत, पण महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प आहे!
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com