लोणी काळभोर (पुणे) : गावातील वरिष्ठांना कात्रजचा घाट दाखवत ग्रामपंचायतीची निवडणूक तरुणाईने हाती घेतल्याने उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पप्पू उर्फ संतोष हरीभाऊ कांचन यांची तर उपसरपंचपदी संचिता संतोष कांचन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संचिता कांचन या पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांच्या पत्नी आहेत. दरम्यान ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षातील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी लक्षात घेता, याही निवडणुकीत वरील दोन्ही पदासाठी घोडेबाजार होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, उरुळी कांचनमधील तरुण नेत्यांच्याबरोबरच वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध केली. दोन्ही पदासाठी होणारा संभाव्य घोडेबाजार टाळण्यात यश मिळवले आहे.
आता नाशिकमध्येही होणार फलकांचे मराठीकरण #sarkarnama #sarkarnamanews #Nashik #Marathi https://t.co/eBaUt4DSvj
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 10, 2021
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, माजी सरपंच ज्ञानोबा तुळशीराम कांचन व माजी सरपंच दत्तात्रेय कांचन यांच्या नेतृत्वाखालील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनेल सतरापैकी बारा जागा जिंकत ग्रामपंचायतीवर निर्वीवाद सत्ता मिळवली होती. मात्र, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे मागील पाच वर्षातील राजकारण, निवडुन आलेले सदस्य एकत्र राहणार का याबद्दल ग्रामस्थांच्याबरोबरच गावातील नेत्यांच्याही मनात शंका होती. मात्र, के. डी. कांचन, महादेव कांचन, ज्ञानोबा कांचन, दत्तात्रेय कांचन, भाऊसाहेब तुपे, धनंजय दीक्षित आदी नेत्यांनी एकत्र येत सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध करुन केली. यात बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष व या निवडणुकीतील सरपंचपदाचे उमेदवार अमित कांचन यांनीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोलाची भुमिका बजावली.
दरम्यान हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निकेतन कृष्णाजी धापटे व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १०) सकाळी करा वाजण्याच्या सुमारास निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंच व उपसरपंच पदासाठी अनुक्रमे संतोष कांचन व संचिता कांचन या दोघांचेच अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकरी निकेतन धापटे व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी वरील दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. दरम्यान संतोष कांचन व संचिता कांचन यांच्या नावाची सरपंच व उपसरपंचपदी घोषणा होताच ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाके फोडून आनंद साजरा केला.
नवनिर्वाचिच सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन व बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दत्तात्रय शांताराम कांचन, दत्तात्रय बाजीराव कांचन, आबासाहेब पाटीलबुवा कांचन, रामचंद्र धोंडिबा कांचन, धनंजय दीक्षित, सुभाष बागडे, दिलीप लोंढे, भाऊसाहेब तुपे आदी उपस्थित होते.
सरपंच निवडीसाठी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनेलचे नवनिर्वाचित सदस्य मिलिंद तुळशीराम जगतात, राजेंद्र बबन कांचन, ऋतुजा अजिंक्य कांचन, अनिता सुभाष कांचन, सीमा दत्तात्रय कांचन, मयूर पोपट कांचन, अनिता भाऊसाहेब तुपे, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, प्रियंका ओंकार कांचन, सुजाता चंद्रकांत खलसे, अमित भाऊसाहेब कांचन, स्वप्नीशा आदित्य कांचन, शंकर उत्तम बडेकर, सुनिल आबुराव कांचन, सायली जितेंद्र बडेकर, सदस्य उपस्थित होते.
और पप्पू पास हो गया...
संतोष कांचन यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे समजताच, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी संतोष कांचन यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतांना बाबुराव पाचर्णे यांनी काही दिवसापुर्वी सोशल मीडियात गाजलेल्या "..और पप्पू पास हो गया.." या पोस्टचा वापर केल्याने एकच हास्यकल्लोळ झाला.
पाणीपुरवठा योजना मंजूर करणार
नवनिर्वाचित सरपंच संतोष कांचन म्हणाले की, उरुळी कांचन शहराची लोकसंख्या लक्षात घेता, सध्या नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही हे वास्तव आहे. पाच वर्षापूर्वी उरुळी कांचन शहरासाठी चाळीसहुन अधिक कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजुर झाली होती. मात्र, पाच वर्षात संबधित पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सुधारीत पाणीपुरवठा योजना व कचरा व्यवस्थापन या दोन गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणार आहे.
ग्रामीण रुग्णालयासाठी प्रयत्न करणार
नवनिर्वाचित उपसरपंच संचिता कांचन म्हणाल्या, "उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी उरुळी कांचन येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सध्या जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याच परिसरात पुढील काही महिण्यात ग्रामीण रुग्णालय सुरु होईल, यासाठी मिळालेल्या पदाचा उपयोग करणार आहे.

