विरोधक, सत्ताधाऱ्यांना खडसेंनी सुनावले...एका महिलेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात.. 

एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीची देशभरात चर्चा केली जात आहे. या गोष्टीचं मला दुःख झालेलं आहे, असे रक्षा खडसे म्हणाल्या.
rk28.jpg
rk28.jpg

मुंबई : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. यावर आता राजकारण पेटलं आहे. यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रक्षा खडसे म्हणाल्या, “याविषयी मला एकच म्हणायचं आहे की, कोणीही ही गोष्ट केलेली असली तरी एका महिलेबाबत विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला समाज माध्यमातून जास्त व्हायरल करण्याची गरज नाही. कारण तुम्ही एका महिलेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. एक लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीची देशभरात चर्चा केली जात आहे. या गोष्टीचं मला दुःख झालेलं आहे,” 

रक्षा खडसे म्हणाल्या, “काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही बातमी मला कळाली. मी वेबसाईटवर जाऊन पाहिलं तेव्हा ते रावेरचं होतं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की गुगल ट्रान्सलेटरवर रावेर शब्द टाकल्यास त्याचे वेगवेगळे उच्चार आणि अर्थ येत आहे. पण हे भाजपाकडून केलं गेल असेल असं मला वाटत नाही. कारण माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर जे मेसेज आले किंवा जे स्क्रीनशॉट पाठवले गेले ते ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ या फेसबुक पेजवरील आहेत. हे पेज कोण चालवतंय ते आम्हाला माहिती नाही. यासंदर्भात माझं जिल्हा पोलिस प्रमुखांशी आणि पक्षाच्या लोकांशी बोलणं झालं असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे”
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, "याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकुर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता." असे टि्वट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर ही चुक लक्षात आल्यावर हा चुकीचा उल्लेख काढून टाकण्यात आला. ती चुक सुधारण्यात आली. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून भाजच्या खासदार म्हणून निवडूण आल्या आहेत. भाजपच्या बेवसाईटवर त्यांची ओळख वाईट शब्दात करण्यात आल्याचे स्क्रीनशॅाट समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबधितावर कारवाईचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. याविषयी देशमुख यांनी टि्वट केलं आहे. 

"भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा पुढील कारवाई करेल," असे टि्वट अनिल देशमुख यांनी केलं आहे. 
 
पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी स्क्रीनशॉट जोडत एक ट्वीट केलं आहे. भाजपची अधिकृत वेबसाइट कोण चालवतं? त्यात  खासदार रक्षा खडसे यांच्यासोबतच गे समुदायाचाही अवमान करण्यात आला आहे, असे चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना या ट्वीटमध्ये टॅग केले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com