भाजपमध्ये द्वेषाचे राजकारण, गोपीनाथ मुंडे, खडसेंना पराकोटीचा त्रास दिला.. - The politics of hatred in BJP, Munde, Khadse suffered a lot | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमध्ये द्वेषाचे राजकारण, गोपीनाथ मुंडे, खडसेंना पराकोटीचा त्रास दिला..

गणेश पांडे
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

या पक्षात आमच्या नावालाच विरोध होता, जयसिंगराव गायकवाड यांच्यातील व माझ्या नावातील जय, गोपीनाथ मुंढे व एकनाथ खडसे यांच्या नावातील नाथ यांना नको होता. त्यामुळे पराकोटीचा त्रास देवून राजकारण संपविण्याचे काम या पक्षातील नेत्यांनी केले आहे.

परभणी ः भारतीय जनता पक्षात द्वेषाचे राजकारण सुरु झाले आहे. त्यांना आमच्या नावांशीच वैर होते. जयसिंग व धनंजय मधला जय, गोपीनाथ आणि एकनाथामधील नाथ हा भाजपच्या नेतृत्वाला नको होता असा, आरोप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांनी परभणीत केला. द्वेषाने भरलेला पक्ष एक दिवस रसतळाला गेल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी यावेळी दिला.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व शिवसेना आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मुंढे यांच्या उपस्थितीत शिवाजी महाविद्यालयात  कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी खासदार संजय जाधव, प्रा. फौजिया खान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींची उपस्थिती होती.

धनंजय मुंढे म्हणाले, राज्यात सध्या लोकशाहीचे उत्तम उदाहरण असलेले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटातही महाविकास आघाडीचे सरकार उत्तम कामे करीत आहे. पदवीधर, बेरोजगार यांच्या प्रश्नावर सातत्याने सरकार चांगले निर्णय घेत आहे. आगामी काळात मेगा नोकर भरतीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे.

राज्यात भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांची संख्या आता वाढत आहे. या पक्षात द्वेषाचे राजकारण सुरु झाले आहे. नुकतेच भाजप मधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या भाषणाचा धागा पकडत मुंढे यांनी भाजपवर निशाणा साधला. या पक्षात आमच्या नावालाच विरोध होता, जयसिंगराव गायकवाड यांच्यातील व माझ्या नावातील जय, गोपीनाथ मुंढे व एकनाथ खडसे यांच्या नावातील नाथ यांना नको होता.

त्यामुळे पराकोटीचा त्रास देवून राजकारण संपविण्याचे काम या पक्षातील नेत्यांनी केले आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम कार्य करणार आहे. त्यामुळे राज्यात भाजप 'बी' ला सुध्दा सापडणार नाही असे ते म्हणाले. पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना विजयी करण्याचे आवाहन देखील मुंढे यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख