राष्ट्रवादीचे माजी आमदार पुन्हा सक्रिय..अनेक प्रश्नाचा पाठपुरावा..

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे पुन्हा सक्रिय झाले आहेत.
vilash lade29.jpg
vilash lade29.jpg

पिंपरी : सव्वा वर्षापूर्वी विधानसभेला झालेल्या पराभवानंतर काहीसे विजनवासात गेलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्नाबाबत त्यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. शहराला भेडसावणारा शास्ती हा कर पूर्ण माफ करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची नुकतीच भेट घेऊन हा प्रश्न पूर्णपणे निकाली काढण्याची मागणी केली. वकिलांमार्फत हा प्रश्न समजावून घेतल्यानंतर तो शंभर टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पार्थ पवार यांनी त्यांना दिले.

यामुळे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी राष्ट्रवादीने पार्थ पवार यांच्याकडे सोपवली असल्यालाही दुजोरा मिळाला आहे. पार्थ हे पंढरपूरमधून विधानसभेची पोटनिवडणूक लढविणार असल्याच्या उठलेल्या वावड्यांवर त्यांच्याकडे पिंपरी चिंचवडची जबाबदारी असल्याचे अजितदादांनीही सांगितले होते. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ हे गत लोकसभेला लढले होते. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र आदीनिमित्त ते शहरात येत आहेत.
 
शास्तीमुळे रहिवाशीच नाही, तर पालिकाही बेजार झाली आहे. कारण, शास्तीमुळे रहिवासी मिळकतकराचा भरणा करीत नसल्याने पालिकेच्या महसूलात या आर्थिक वर्षात (२०२०-२१) कोरोनामुळे अगोदरच लक्षणीय घट झाली आहे. दुसरीकडे कोरोनामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे महसूल वाढीसाठी शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर येत्या ३१ मार्चपर्यंत भरण्याची सवलत राज्य सरकारने नुकतीच दिली आहे. मात्र, या तात्पुरत्या दिलाशावर पालिकेतील सत्ताधारी भाजपने टीका केली. सरसकट शास्तीमाफी देण्याची मागणी सरकारने मान्य करावी, असे सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी म्हटले आहे. त्यामुळेच हा कर पूर्णपणे माफ करून शहरवासियांना पूर्ण दिलासा द्यावा, यासाठी पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे अध्यक्ष असलेले लांडे, उपाध्यक्ष धनजंय भालेकर व सदस्यांनी नुकतीच पुण्यात पार्थ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही लेखी मागणी केली. त्यावर वकिलांमार्फत त्यातील कायदेशीर तिढा पार्थ यांनी प्रथम समजावून घेतला. त्यानंतर त्यात लक्ष घालून तो शंभर टक्के सोडविला जाईल, यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले, असे भालेकर यांनी सरकारनामाला या भेटीनंतर सांगितले.

दरम्यान, गत विधानसभेला अपक्ष म्हणून पराभूत झाल्यानंतर मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर गेलेले लांडे हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी शास्तीला कारणीभूत ठरलेली अनधिकृत बांधकामे ही नियमित करण्याची मागणी प्रथम केली. आपला ड्रीम प्रोजेक्ट असलेली भोसरीतील बालनगरी रद्द करून तेथे कला अकादमीचे राज्यातील केंद्र उभारणीसही त्यांनी विरोध केला आहे. डीपीसाठी पैसे देऊनही जागा ताब्यात न आल्याने त्याबाबत त्यांनी आवाज उठवला आहे. कोरोना काळातील अवास्तव दराने झालेल्या खरेदीला आक्षेप घेत त्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्याकडेच केली आहे. एकूणच भोसरीतीलच नाही, तर शहरातील प्रलंबित प्रश्नी आवाज उठवून त्याचा पाठपुरावा करण्यास लांडे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यातून त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीची पक्षाची तयारी सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com