पोलिसांनी निष्कर्ष काढल्यानंतर मुंडेबाबत निर्णय : जयंत पाटील - Politics Decision on Dhanajay Munde after police conclusions Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांनी निष्कर्ष काढल्यानंतर मुंडेबाबत निर्णय : जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झालेली नाही. पोलिसांनी निष्कर्ष काढल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. याप्रकरणामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की धनंजय मुंडे यांना अनेक वर्षापासून  ब्लॅकमेल केलं जात होत. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झालेली नाही. या प्रकरणाची शहानिशा झाल्यानंतर तसेच पोलिसांनी निष्कर्ष काढल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.  

यावर शरद पवार म्हणाले, ''मुंडे हे काल मला भेटले होते. त्यांनी मला सविस्तर मला माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबध होते. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्याची चैाकशी सुरू आहे. आपल्यावर व्यक्तीगत हल्ले होऊ शकतात, म्हणून मूंडे यांनी याबाबत भूमिका घेऊन न्यायालयात गेले होते. न्यायालयाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे याबाबत भाष्य करणं चुकीचं आहे. मुंडेंनी सांगितलेली माहिती अन्य मंत्र्यांना सांगणार आहे. मी माझ्या सहकार्यासोबत चर्चा करणार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.''

मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''धनंजय मुंडे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा राजकारणाचा मुद्द्या होऊ शकत नाही. मुंडेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल हा भ्रम आहे.'' तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 

तक्रारीवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या सर्व प्रकरणात आता पोलिस गुन्हा दाखल करणार का, मुंडेची आमदारकी रद्द होऊ शकते का, असे प्रश्न विचारले जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांच्या अंगलट हे प्रकरण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख