पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही लस कधी घेणार हा प्रश्न काल पुण्यात पत्रकारांनी विचारला होता. त्यावर आधी कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टर, मेडीकल स्टाफला लस देण्याचं नियोजन आहे, आम्ही यात येत नाही, ज्या दिवशी आम्हाला सांगितलं जाईल की लस घ्या त्या दिवशी आम्ही लस घेऊ, असं अजितदादांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी टि्वट करून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, "कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात. पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा??
कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा??https://t.co/6qXMnXrOyk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 22, 2021
काल पुण्यात अजित पवारांना तुम्ही लस कधी घेणार हा प्रश्न विचारल्यावर दादा म्हणाले की आधी कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टर, मेडीकल स्टाफला लस देण्याचं नियोजन आहे, आम्ही यात येत नाही, ज्या दिवशी आम्हाला सांगितलं जाईल की लस घ्या त्या दिवशी आम्ही लस घेऊ, असं सांगत लोकप्रतिनिधी कधी लस घेणार या प्रश्नाला दादांनी मिश्कीलपणे उत्तर दिलंय.
चक्कर येण्यासारखे किरकोळ अपवाद वगळता कोरोना लसीकरणाची सुरवात पुणे जिल्ह्यात झाली. पण काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याबाबत तूर्त वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतल्याने कोरोना लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यात प्रशासनाला अपयश आले. पिंपरीमध्ये पहिल्या दिवशी ५७ टक्के लसीकरण झाले. २४ जणांनी लस टोचून घेण्यास चक्क नकार दिला होता.
अजित पवार यांनी काल जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाबाबत आढावा घेतला. लसीकरण कमी होत असल्याचं निदर्शनास आल्याचं पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, "का लसीकरण कमी होतं काय कळत नाही, मात्र अनेक कर्मचारी लस घेण्यास धजावत नाही. कोविन अँपमुळेही गोंधळ निर्माण झाला आहे. कारण देशस्तरावर काम करणार ते अँप आहे, त्यामुळे लसीकरण वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात फारचं कमी लसीकरण झाल आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरण कमी आहे, त्यामुळे लसीकरण वाढवावं लागणार आहे, शहरातील इतर हॉस्पिटल्सनी लसीकरणाची परवानगी मागितली आहे, ती देण्याच्या संदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपूरावा करीत आहेत.

