संजयकाका, जयंत पाटलांच्या भेटीनं नवी राजकीय समीकरणं ?   - Politic sangli NCP leader jayant patil forces bjp mp sanjaykaka patil to seat besides | Politics Marathi News - Sarkarnama

संजयकाका, जयंत पाटलांच्या भेटीनं नवी राजकीय समीकरणं ?  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

संजयकाका व जयंत पाटलांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

सांगली : भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली. भाजपमध्ये नाराज असलेल्या संजयकाका व जयंत पाटलांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

संजयकाका  'नको नको' म्हणत असताना जयंत पाटलांनी त्यांना आपल्या जवळ बसवून पंधरा मिनिटे चर्चा केली. त्यामुळे अनेक तर्कविर्तक केले जात आहेत. भाजपच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित न राहणारे संजयकाका सांगलीतील एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या मांडीला माडी लावून बसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’च्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर झालेली भेट नवी राजकीय समीकरणं तर निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. 

संजयकाका पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात संजयकाका हे अनुपस्थित होते. पण  मात्र, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्यावेळी संजयकाका पाटील आवर्जून उपस्थित राहतात, हे काही कार्यक्रमांचे निमित्ताने आढळले आहे. या अगोदरही जयंत पाटील आणि संजयकाका पाटील एका बंद खोलीतून चर्चा करून एकत्र बाहेर पडल्याचे दिसले आहे.  

सांगली लोकसभा मतदारसंघाचे  संजयकाका पाटील हे खासदार आहेत. 
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ते भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले आहेत. आक्रमक नेतृत्व म्हणून संजयकाकाची ओळख आहे. काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला संजयकाका पाटील यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून ते विधानपरिषदेचे आमदार झाले. पुढे राष्ट्रवादीला राम राम ठोकून त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख