पिंपरी : ''ज्या पालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांनी गेल्या चार वर्षात भाजपला दरोडेखोरी करण्याचे लायसन्स दिले, त्यांच्याच दालनाबाहेर आंदोलन करायला त्यांना लाज कशी वाटली नाही,'' अशी विचारणा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादीने केली आहे. हीच भाजपची संस्कृती आहे का, असा हल्लाबोलही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच कानपिचक्या दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी आक्रमक झालेली आहे.
पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपने आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेची गेल्या सोमवारी (ता. १) आयोजित केलेली सोडत ती राजशिष्टाचाराला धरून नसल्याचे कारण देत ऐनवेळी प्रशासनाने आयत्या वेळी रद्द केली. त्यामुळे भाजपची मोठी नामुष्की झाली. राजकीय श्रेयासाठी राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीने प्रशासनाला हाताशी धरून ही सोडत रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच आयुक्त दालनाबाहेर त्याच दिवशी त्यांनी धरणे आंदोलन केले. त्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला आहे.
जनतेशी नाळ तुटलेले महाबेशरम आघाडी सरकार... #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiPoliticshttps://t.co/7YEYTOOmed
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 13, 2021
या योजनेचे फक्त वीस टक्के काम झाले आहे. तिला न्यायालयातही आव्हान देण्यात आलेले असल्याने गरजूंची नाहक फरफट झाली असती. त्यांना निव्वळ आशेला लावणे योग्य नव्हते. म्हणून लगेचच सोडत काढण्यास आमचा विरोध होता. तरीही फक्त पालिका निवडणूक वर्षभरावर आल्याने त्यासाठी ती काढण्याचा आटापिटा केल्याने त्यावर झालेला खर्च भाजपचे पदाधिकारी व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या तीन पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
आमच्या सत्ताकाळात जेएनएनयूआरएमअंतर्गत आम्ही पावणेचार लाखाला अशी घरे दिली. तीच भाजप आता आठ लाखाला देत असेल, तर त्याचे श्रेय त्यांनी घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. या योजनेत भाजपप्रणित अनेक एंजटांनी गोरगरीबांना घरे देतो, म्हणून कोट्यावधींचे कमिशन लाटल्याच्या तक्रारींच्या चौकशीसाठी आग्रही राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट व चंद्रकांत पाटील यांना राजशिष्टाचाराप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाला आमंत्रित करूनही ते फिरकले नाहीत याची आठवणही त्यांनी करून दिली. विकासकामात राजकारण न आणण्याची अजितदादांची कामाची ही पध्दत साऱ्या महाराष्ट्राला आणि त्यातही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांना शहरातल्यांना चांगलीच अवगत आहे, असा टोमणाही त्यांनी मारला.

